आनंदराव पाटील तिसऱ्यांदा सभापतीपदी

By Admin | Updated: August 26, 2015 00:27 IST2015-08-26T00:27:41+5:302015-08-26T00:27:41+5:30

इस्लामपूर बाजार समिती : सुरेश गावडे दुसऱ्यांदा उपसभापती

Anandrao Patil nominated for third term as Speaker | आनंदराव पाटील तिसऱ्यांदा सभापतीपदी

आनंदराव पाटील तिसऱ्यांदा सभापतीपदी

इस्लामपूर : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या पदाधिकारी निवडीत मंगळवारी कुणालाच खळखळ करू न देता आ. जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांनी विद्यमान सभापती आनंदराव पाटील (साखराळे) यांना, तर उपसभापतीपदी सुरेश गावडे (कासेगाव) यांनाच पुन्हा संधी दिली. पाटील हे तिसऱ्यांदा सभापतीपदी विराजमान होत आहेत, तर उपसभापती पदासाठी गावडे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जयंत पाटील सभागृहात पीठासीन अधिकारी तथा सहायक निबंधक अमोल डफळे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती आणि उपसभापती निवडीसाठी संचालकांची विशेष सभा झाली. बाजार समिती सचिव विजयकुमार जाधव यांनी सहायक म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी पक्षश्रेष्ठी रामराव देशमुख, प्रा. शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सचिन पाटील यांनी सर्व संचालकांसोबत चर्चा करून आ. जयंत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.त्यानंतर मुख्य निवडीच्या प्रक्रियेत सभापती पदासाठी आनंदराव शामराव पाटील (साखराळे) आणि उपसभापती पदासाठी सुरेश शिवाजी गावडे (कासेगाव) यांचे अर्ज दाखल करण्यात आले. पाटील यांना माजी सभापती दिलीप देसाई व अल्लाउद्दीन चौगुले यांनी, तर गावडेंसाठी अ‍ॅड. विश्वासराव पाटील व संपतराव पाटील यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला.
विहित वेळेत दोघांचे प्रत्येकी एकेकच अर्ज राहिल्याने सहायक निबंधक अमोल डफळे यांनी सभापती म्हणून आनंदराव पाटील यांची, तर उपसभापतीपदी सुरेश गावडे यांची निवड घोषित केली.
आनंदराव पाटील १९९० ते ९२ या कालावधित सभापती होते. त्यानंतर मागील वर्षभरापासून या पदाची धुरा ते सांभाळत होते.
या निवडीने त्यांना तिसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली. यावेळी बाबूराव पाटील, माणिक गायकवाड, शामसुंदर पाटील, शंकर खांबे, बाबासाहेब पाटील, कलगोंडा पाटील, सुभाष शिंगटे, पद्मश्री पाटील, बाळाबाई मस्के, निवास पाटील, संदीप पाटील, दिलीप कदम, नंदकुमार मानकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Anandrao Patil nominated for third term as Speaker