मृताची सही करून वाहन नावावर करण्याचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:52 IST2022-08-12T15:52:06+5:302022-08-12T15:52:29+5:30
हा प्रकार लक्षात येताच आरटीओ कर्मचाऱ्यांनी संशयिताविरोधात शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मृताची सही करून वाहन नावावर करण्याचा प्रयत्न, एकावर गुन्हा दाखल
सांगली : शहरातील गावभाग परिसरातील व्यक्ती मृत झाली असतानाही तिच्या नावावरील मोटारीचे परस्पर हस्तांतरण करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी प्रताप प्रभाकर जामदार (रा. यशवंत कॉलनी, मिरज) यांनी श्रीशैल शशिकांत कदम (रा. जामवाडी, सांगली) याच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. गावभाग परिसरातील श्रीकांत कृष्णा निर्मळे हे २४ सप्टेंबर २०१९ रोजी मयत झाल्याने नियमानुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर होणे अपेक्षित होते. असे असतानाही निर्मळे यांच्या निधनानंतर हे वाहन वर्षभर स्वत:च्या नावावर करण्यासाठी आरटीओंकडे अर्ज केला.
यासाठी त्याने आवश्यक फॉर्मवर सह्या करून ते जमा केले. विशेष म्हणजे निर्मळे यांचे निधन झाले असतानाही त्यांच्या सह्या करून हा फॉर्म दाखल करण्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच आरटीओ कर्मचाऱ्यांनी संशयिताविरोधात शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.