अलमट्टी धरण ९८ टक्के भरले, धरणातील विसर्ग वाढविला
By अशोक डोंबाळे | Updated: August 5, 2023 19:18 IST2023-08-05T19:17:42+5:302023-08-05T19:18:53+5:30
सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के ...

अलमट्टी धरण ९८ टक्के भरले, धरणातील विसर्ग वाढविला
सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार क्युसेकवरून शनिवारी दुपारपासून ७० हजार क्युसेकने विसर्ग चालू केला आहे. भविष्यात पाऊस आल्याचा कर्नाटकातील गावांना पुराचा धोका निर्माण होऊ नये, म्हणून विसर्ग वाढविला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अलमट्टी धरणात ८५ हजार ७५१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण ९८ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण १०० टक्के भरू शकते, अशी परिस्थिती आहे. यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातून विसर्ग तीन लाखांवर करावे लागणार आहे. तरीही अमलट्टी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवता येणार नाही. तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने शनिवारी धरणातील विसर्ग ४२ हजार क्युसेकवरून ७० हजार क्युसेकने केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा
धरण - आजचा साठा - क्षमता
कोयना - ७९.७० - १०५.२५
धोम - ११.१२ - १३.५०
कन्हेर - ७.३८ - १०.१०
वारणा - २९.१७ - ३४.४०
दूधगंगा - १९.३७ - २५.४०
राधानगरी - ८.२८ - ८.३६
तुळशी - २.४४ - ३.४७
कासारी - २.५३ - २.७७
पाटगाव - ३.२२ - ३.७२
धोम-बलकवडी - ३.५० - ४.०८
उरमोडी - ६.१५ - ९.९७
तारळी - ५.०२ - ५.८५
अलमट्टी - १२०.७६ - १२३