आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत : भारत पाटणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:40 IST2018-11-09T23:37:11+5:302018-11-09T23:40:46+5:30
श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे.

बलवडी (भा.) येथील बळीराजा स्मृती धरणाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. गेल आॅमवेट, दिलीप पाटील, मोहनराव यादव, विलास चव्हाण यावेळी उपस्थित होते.
आळसंद : श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. हे यश चळवळीच्या रेट्यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे बळीराजा जलसंवर्धन विकास संस्थेतर्फे बळीराजा धरणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी पाटणकर बोलत होते. यावेळी राज्य संघटक मोहनराव यादव, दिलीप पाटील, गेल आॅमवेट उपस्थित होते.राज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे. हे धरण म्हणजे परिवर्तनीय चळवळीचा पाया आहे. टेंभू व ताकारी योजनेचे पाणी समन्यायी पध्दतीने देण्याचे धोरण हाती घेणार आहे.
यावेळी दिलीप पाटील, अॅड. कृष्णा पाटील, आनंदराव पाटील, मारूती शिरतोडे, डॉ. संजय कांबळे, अजित खराडे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे परशुराम माळी, देवकुमार दुपटे, विलास चव्हाण, दाजी देशमुख, अनिल दुपटे, पांडुरंग चव्हाण, धम्मसागर भारती, दीपक पाटील, उत्तम चव्हाण, राजू राजे, शैलेंद्र दुपटे, सागर गोतपागर, विक्रम चव्हाण, सुरेश चव्हाण उपस्थित होते.मच्छिंद्र पवार यांनी स्वागत केले. रघुनाथ पवार यांनी आभार मानले.
डिसेंबरमध्ये पुन्हा आंदोलन
डॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडीला बंद पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तो पॅटर्न राज्यभर स्वीकारावा, यासाठी डिसेंबरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.