Sangli-Local Body Election: तासगावात निर्णायक ठरणार नाराजीचा पॅटर्न, अजित पवार गट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:48 IST2025-11-26T17:47:56+5:302025-11-26T17:48:15+5:30
नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता

Sangli-Local Body Election: तासगावात निर्णायक ठरणार नाराजीचा पॅटर्न, अजित पवार गट चर्चेत
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी सर्वच पक्ष आणि गटांना नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषता: शरद पवार गटातून नाराज झालेल्या अजय पाटील यांनी बंडाचा झेंडा घेऊन थेट अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवला आहे.
उमेदवारी डावलल्यामुळे संजयकाका गटाशी सलगी असणारे काँग्रेसचे महादेव पाटील नाराज आहेत; तर भाजपच्या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर निघालेले संदीप गिड्डे पाटील देखील नाराज आहेत. अजय पाटील यांचा अपवाद वगळता इतरांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र या वेळच्या निवडणुकीत नाराजीचा पॅटर्न निवडणूक निकालात निर्णायक ठरणार आहे, हे निश्चित.
वाचा: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी
आमदार रोहित पाटील यांच्या गटात उमेदवारी डावलल्यामुळे पहिल्या फळीतील काही नेते नाराज झाले. अनेकांची नाराजी दूर झाली, मात्र अजय पाटील यांनी थेट पक्ष बदलून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात बंडाचे निशाण उभारले.
दुसरीकडे, माजी खासदार संजय पाटील यांच्याशी सलगी असलेले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांच्या पत्नीची उमेदवारी डावलण्यात आली. ते नाराजी दाखवून देणार का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र एकंदरीत राजकीय चित्र पाहिल्यानंतर लवकरच महादेव पाटील राजकीय व्यासपीठावर दिसतील, अशी चर्चा आहे.
तर भाजपने यावेळी माजी खासदार संजय काकांना वगळून, पहिल्यांदाच तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासह सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेत सुरुवातीच्या टप्प्यात किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील हे देखील सहभागी होते. मात्र नंतरच्या काळात पक्षांतर्गत घडामोडीनंतर संदीप गिड्डे पाटील निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दूर झाल्याचे दिसून आले. तर तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी एकहाती सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे गिड्डे पाटील यांच्या भूमिकेचा देखील अद्याप सस्पेन्स कायम आहे.
अजित पवार गट चर्चेत
विधानसभा निवडणूक अजित पवारांच्या गटातून लढवलेल्या माजी खासदार संजय काकांनी अजित पवार गटासोबतून हरकत घेतली. त्यानंतर या निवडणुकीत अजित पवारांच्या गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शरद पवार गटात नाराज झालेल्या अजय पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे तासगाव शहरात अजित पवार गट पुन्हा चर्चेत आला आहे.