Sangli News: शिराळ्याच्या संशोधकाने घातली वाघिणींच्या गळ्यात 'कॉलर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:20 IST2025-12-26T15:18:24+5:302025-12-26T15:20:01+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नुकत्याच दोन वाघिणींचे चांदोली राष्ट्रीय उद्यानात यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे

Sangli News: शिराळ्याच्या संशोधकाने घातली वाघिणींच्या गळ्यात 'कॉलर'
विकास शहा
शिराळा : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी (STR) एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नुकत्याच दोन वाघिणींचे चांदोली राष्ट्रीय उद्यानात यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे. ‘चंदा’ (STR-T4) आणि ‘तारा’ (STR-T5) अशी या दोन्ही वाघिणींची नावे असून, त्यांच्या आगमनामुळे सह्याद्रीचा परिसर आता व्याघ्र गर्जनेने दुमदुमणार आहे. शिराळा तालुक्यातील संशोधक आकाश भीमराव पाटील (भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
या संपूर्ण मोहिमेत शिराळा तालुक्यातील संशोधक आकाश भीमराव पाटील (भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. दोन्ही वाघिणींच्या गळ्यात ‘रेडिओ कॉलर’ बसवण्याचे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले. यामुळे या वाघिणींच्या हालचालींवर वनविभागाची २४ तास नजर राहणार आहे. आकाश पाटील गेल्या १० वर्षांपासून पश्चिम घाटात जैवविविधता संवर्धनाचे कार्य करत असून, ‘प्लॅनेट अर्थ फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.
शंभर वाघांच्या अभ्यासानंतर निवड
व्याघ्र पुनर्वसनाचा हा प्रवास सोपा नव्हता. २०१७ ते २०२२ या काळात पहिल्या टप्प्यात अधिवास आणि भक्ष्यांची संख्या यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने ५ मादी आणि ३ नर अशा एकूण ८ वाघांच्या स्थलांतरास मंजुरी दिली. नोव्हेंबर २०२५ मध्ये ताडोबातील तब्बल १०० वाघांच्या निरीक्षणातून आणि तांत्रिक छाननीतून 'चंदा' आणि 'तारा' यांची निवड करण्यात आली. या निवड समितीमध्ये आकाश पाटील यांचा समावेश होता.
सह्याद्रीतील वाघांची संख्या पाचवर!
नवे पाहुणे: चंदा (१४ नोव्हेंबर २०२५) आणि तारा (९ डिसेंबर २०२५).
स्थानिक नर वाघ: सेनापती, बाजी आणि सुभेदार.
एकूण संख्या: सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता एकूण ५ वाघ झाले आहेत.
येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने आणखी सहा वाघांचे स्थलांतर केले जाणार आहे.
पर्यटनाला मिळणार नवी झळाळी
या यशस्वी व्याघ्र पुनर्वसनामुळे चांदोली आणि शिराळा परिसरातील निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. वाघांच्या अस्तित्वामुळे या भागातील इको-सिस्टम अधिक मजबूत होईलच, पण स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.
"सह्याद्री व्याघ्र राखीवच्या या ऐतिहासिक टप्प्यात सहभागी होता आले, याचा सार्थ अभिमान आहे. 'चंदा' आणि 'तारा'च्या कॉलरिंगमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा आणि अभ्यासाचा मार्ग सुकर झाला आहे." — आकाश भीमराव पाटील (संशोधक)