Sangli Politics: आबांना मीच उपमुख्यमंत्री केले, पण तुम्ही काय राखले?, अजित पवारांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 04:12 PM2024-02-07T16:12:02+5:302024-02-07T16:16:10+5:30

सांगली जिल्हा दौऱ्यावेळी अजित पवारांनी आबाप्रेमींकडून स्वागत स्वीकारण्यास दिला नकार 

Ajit Pawar during his visit to Sangli district R. R. Patil Refused to accept reception from the office bearers of the group | Sangli Politics: आबांना मीच उपमुख्यमंत्री केले, पण तुम्ही काय राखले?, अजित पवारांचा सवाल 

Sangli Politics: आबांना मीच उपमुख्यमंत्री केले, पण तुम्ही काय राखले?, अजित पवारांचा सवाल 

दत्ता पाटील 

तासगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार तासगावातून जात असताना, त्यांच्या स्वागतासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दिवंगत राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांच्या गटाचे पदाधिकारी सज्ज होते. मात्र, अजित पवार यांनी स्वागत स्वीकारण्यास नकार देत या पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे झिडकारले. मात्र, त्याचवेळी खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील आणि स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा सत्कार स्वीकारला. त्यामुळे या प्रकाराची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. विट्याहून सांगलीला जाताना, खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी विटा नाका येथे स्वागत केले. बाजार समितीच्या समोर वाहनांचा ताफा थांबला. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी गाडीतून बाहेर उतरण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना केली. मात्र, अजित पवार यांनी आर. आर. आबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना झिडकारले. ‘आबांना उपमुख्यमंत्री मीच केले. हेलिकॉप्टर मी पाठवले. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी सोबत होतो. तुम्ही माझी काय राखली?’ असा सवाल उपस्थित करून स्वागत स्वीकारणे टाळले.

तिथून काही अंतरावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अजिप पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केलेला सत्कार त्यांनी आनंदाने स्वीकारला. तासगावात येणाऱ्या सर्वच मंत्र्यांचे राष्ट्रवादीकडून स्वागत व सत्कार केला जातो. अगदी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तासगावात आले होते, त्यावेळीदेखील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवारांनी त्यांचे स्वागत स्वीकारले नाही.

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांच्या घरातूनच उपमुख्यमंत्र्यांना समर्थन

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील आमदार सुमनताई पाटील यांच्या सोबत आहेत. मात्र, सावर्डे गावातच तालुकाध्यक्षांच्या दोन्ही बंधूंनी अजित पवारांच्या स्वागताचे डिजिटल जागोजागी लावले. त्यामुळे या समर्थनाचीही चर्चा रंगली आहे.

नाराजी नेमकी कशासाठी?

आर. आर. पाटील यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाला पवार कुटुंबियांनी मोठा आधार दिला. शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी सतत आबांच्या कुटुंबियांची चौकशी करुन त्यांच्याप्रती आपुलकी दाखविली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवारांची आबांच्या कुटुंबाप्रती आपुलकी कायम असेल, असे वाटत असतानाच त्यांनी दाखविलेली नाराजी नेमकी कशासाठी होती, असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात कल्लोळ करीत आहे.

Web Title: Ajit Pawar during his visit to Sangli district R. R. Patil Refused to accept reception from the office bearers of the group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.