इ-मार्केटिंगद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतमाल जगभर पोहोचेल : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:13 IST2026-03-28T19:12:01+5:302026-03-28T19:13:52+5:30

हळद, बेदाणा, गूळ या तीन उत्पादनांची प्राथमिक निवड

Agricultural products of Sangli district will reach the world through e marketing says Chandrakant Patil | इ-मार्केटिंगद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतमाल जगभर पोहोचेल : चंद्रकांत पाटील 

इ-मार्केटिंगद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतमाल जगभर पोहोचेल : चंद्रकांत पाटील 

सांगली : जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मित्रा कंपनी व जिल्हा प्रशासनाने शेतमालाच्या इ-मार्केटिंगसाठी चांगला प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून शेतमाल थेट देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

सांगलीत शुक्रवारी ऑनलाइन खरेदीदार विक्रेता मेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. या मेळाव्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभयकुमार चव्हाण, ‘अपेडा’चे अध्यक्ष डॉ. परशराम पाटील, ‘फ्लिपकार्ट’चे अधिकारी आकाश मित्तल, अमित शिकरवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल. जिल्ह्यातील शेतकरी मेहनती आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिल्यास त्याच्या कष्टाला यश येईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच जोडधंदे व प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. चांगल्या बाजारपेठेत उत्पादनांची विक्री केल्यास अधिक उत्पन्न मिळेल. त्यासाठी आवश्यक बाजारपेठ मिळण्यासाठी इ-मार्केटिंगचा निश्चितच उपयोग होईल.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, इ-मार्केटिंगद्वारे कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी समन्वय साधून बेदाणा, हळद व गूळ या उत्पादनांचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी पाठवले होते. ते यशस्वीरीत्या पात्र ठरले. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून कृषिमाल व प्रक्रियायुक्त उत्पादनांना इ-मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. जिल्ह्यातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल व अन्य प्रक्रिया उत्पादनांचे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केले होते.

शेतकऱ्यांना श्रीमंतीच्या दिशेकडे घेऊन जाणारे जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढून तो श्रीमंत झाला पाहिजे. आपल्या गरजांसाठी त्याला इतरांवर अवलंबून राहण्याची तसेच, कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, असा समृद्ध शेतकरी निर्माण झाला पाहिजे, या दृष्टीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे प्रयत्न चालू आहेत. एक प्रशासकीय अधिकारी आपल्या जबाबदारीच्या पुढे जाऊन शेतकरी हिताचा विचार करतो, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचे आहे, असे मत पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title : ई-मार्केटिंग से सांगली का कृषि उत्पाद विश्व बाजार में पहुंचेगा

Web Summary : सांगली जिले के किसानों को ई-मार्केटिंग से वैश्विक बाजार मिलेगा। फ्लिपकार्ट के साथ मिलकर गुड़, हल्दी और किशमिश जैसे स्थानीय उत्पादों की बिक्री बढ़ेगी। इस पहल का उद्देश्य व्यापक बाजार पहुंच के माध्यम से किसानों की आय और समृद्धि में सुधार करना है।

Web Title : Sangli farm produce to reach global markets via e-marketing.

Web Summary : Sangli district aims to connect farmers to global markets through e-marketing. Collaboration with Flipkart will boost sales of local produce like jaggery, turmeric, and raisins. This initiative aims to improve farmer income and prosperity through broader market access.