शेती उत्पादक, खरेदीदारांचे शुक्रवारी सांगलीत संमेलन; थेट संवाद साधण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:58 IST2025-11-11T19:56:23+5:302025-11-11T19:58:01+5:30
बेदाणा, हळद, द्राक्ष, डाळिंब उत्पादकांचा सहभाग

शेती उत्पादक, खरेदीदारांचे शुक्रवारी सांगलीत संमेलन; थेट संवाद साधण्याची संधी
सांगली : जिल्ह्याच्या दुष्काळी पूर्व भागामध्ये ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळालेले आहे. यामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी यांसारख्या फळबागांचे विस्तार झाले असून, या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी देशभरातील शंभरहून अधिक खरेदीदार आणि हजारो शेतकऱ्यांचे संमेलन शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी सांगलीत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काकडे म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी या फळपिकांचे उत्पादन होते, जे देशांतर्गत, तसेच परदेशी बाजारपेठेत निर्यात केले जाते. विशेषतः द्राक्ष आणि बेदाणा निर्यातीबाबत सांगली जिल्ह्याची विशेष ओळख आहे. फळपिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून, शेतकऱ्यांना हमखास आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध होणे हा या शेत उत्पन्न करणाऱ्या व खरेदीदारांच्या संमेलनाचा मुख्य हेतू आहे.
या संमेलनामुळे शेतकरी, व्यापारी आणि निर्यातीदार यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांची ओळख होणार असून, खरेदीदार व ग्राहकांना खात्रीशीर गुणवत्तापूर्ण फळे मिळण्यास मदत होईल. जिल्ह्याच्या कृषी उद्योगास आणि निर्यातीस चालना देण्यासाठी दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सांगली येथे शेती उत्पादक व खरेदीदारांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हजारो शेतकरी आणि शंभराहून अधिक खरेदीदार या संमेलनात सहभागी होणार आहेत.
फळांसह बाजरी, मटकीचेही प्रदर्शन
या संमेलनात बेदाणा, हळद, डाळिंब, पेरू, सीताफळ, बाजरी, मटकी आणि इतर तृणधान्य तसेच प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचेही प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडील फळे, बाजरी, मटकी खरेदी करणे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नागरिकांसाठी संधी ठरेल. या संमेलनास नागरिकांनी नक्की भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.