सांगली जिल्ह्यात शेतजमीनीचे दर ४२ वर्षांत दीडशे पटींनी वाढले, पिकाखालील क्षेत्र किती उरले..जाणून घ्या
By अशोक डोंबाळे | Updated: May 13, 2025 17:53 IST2025-05-13T17:53:04+5:302025-05-13T17:53:47+5:30
मोठे शेतकरी झाले अल्पभूधारक

संग्रहित छाया
अशोक डोंबाळे
सांगली : शेतीचा वाढता खर्च आणि घटलेले उत्पन्नामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा असल्याची व्यथा शेतकऱ्यांची आहे. उत्पन्नाच्या दृष्टीने शेती परवडत नसल्याचे बोलले जात असले, तरी अलीकडे शेती हा गुंतवणुकीच्या दृष्टीने अग्रस्थानी विषय ठरला आहे. कारण गेल्या ४२ वर्षांत सर्वसाधारण शेतीचे प्रतिएकर भाव तब्बल १५० पटीपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे शेती उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीतून जास्त परतावा देत आहे. डॉक्टर, शासकीय अधिकारी, बिल्डर्ससह व्यावसायिकांनी जमिनीचे भाव वाढविल्याचे चित्र आहे.
खासगीत शेतीचे कोट्यवधींचे व्यवहार होत असले तरी रेडी रेकनर दराने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवण्यात येत आहेत. शेती गुंतवणूक म्हणून खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. शहर परिसर व महामार्गालगतची शेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, बिल्डर्स, उद्योजक, व्यावसायिक गुंतवणूक करत आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी आणि जमीन विकसित करणाऱ्या ठेकेदारांकडील माहितीनुसार गेल्या ४२ वर्षांत जमिनीचे दर दीडशे पटींनी वाढले आहेत.
मोठे शेतकरी झाले अल्पभूधारक
वाढती लोकसंख्या, तुलनेत शेतीचे क्षेत्र तेवढेच असल्याने तुकडीकरण होत आहे. शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक बनले आहेत. त्यातच शेतीचे प्रतिएकर भाव लाखमोलाचे झालेले आहेत. त्यामुळे शेती खरेदी करणे हे मूळ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. आगामी पिढ्यांचा विचार करून शेतकरी शेती विकत नाहीत. त्यातच शेती खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होत असल्याने चढ्या भावाने व्यवहार होत आहेत.
जिल्ह्यात पिकाखालील क्षेत्र उरले ५.७६ लाख हेक्टर
जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र आठ लाख ६१ हजार हेक्टर असून, त्यापैकी पाच लाख ७६ हजार ९०३ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २९ लाखांवर गेली आहे. या आकड्यानुसार जिल्ह्यात प्रती व्यक्ती केवळ ०.१९ एकर शेती उपलब्ध आहे. मात्र, गेल्या १३ वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेतली असता, सध्याच्या काळात प्रती व्यक्ती शेती क्षेत्राची उपलब्धता आणखी घटलेली आहे. परिणामी, शेती क्षेत्रावर असलेला दबाव वाढत असून, शेतीचे तुकडेही अधिक लहान होत चालले आहेत.
गेल्या ४० वर्षांतील प्रतिएकर शेतीचे भाव
वर्ष - शेतीचा दर
- १९८२ - ३००००
- १९८७ - ४००००
- १९९२ - १०००००
- १९९७ - १६००००
- २००० - १८००००
- २००५ - २२००००
- २०१० - १००००००
- २०१५ - २००००००
- २०२० - ३००००००
- २०२५ - ५००००००