तीन वर्षे तयारी, सांगलीतील सुषमा रेपेंनी दक्षिण आफ्रिकेतील खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ केली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:55 IST2025-06-13T18:55:02+5:302025-06-13T18:55:26+5:30
आरटीओ कार्यालयातील महिला लिपिक

तीन वर्षे तयारी, सांगलीतील सुषमा रेपेंनी दक्षिण आफ्रिकेतील खडतर ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ केली पूर्ण
सांगली : दक्षिण आफ्रिकेतील दरवर्षी होणारी अत्यंत खडतर अशी ९० किलोमीटरची ‘कॉम्रेड मॅरेथॉन’सांगलीतील आरटीओ कार्यालयातील महिला लिपिक सुषमा रेपे यांनी वेळेपूर्वी पूर्ण केली.
कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित अल्ट्रामॅरेथॉन पैकी एक मानली जाते. या मॅरेथॉनला अंतिम मानवी शर्यत म्हणूनही ओळखले जाते. १९२१ मध्ये ही मॅरेथॉन पहिल्यांदा आयोजित केली गेली होती. यामध्ये जगभरातून स्पर्धक सहभागी होतात. पहिल्या महायुद्धातील शहीद सैनिकांचा सन्मान प्रीत्यर्थ या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. डर्बन आणि पीटरमॅरिट्झबर्ग या शहरादरम्यान घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत लवचिकपणा आणि सहनशक्तीचा कस लागतो.
कॉम्रेडस् मॅरेथॉनसाठी भारतातील खेळाडूंना दोन ४२ किमी मॅरेथॉन ४ तास ४० मिनिटांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असते. मूळच्या मुरगूड (जि. कोल्हापूर) येथील आणि सध्या सांगलीत आरटीओ कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत सुषमा रेपे यांनी ४२ किमीच्या दोन मॅरेथॉन पूर्ण करत ४ तास ३० मिनिटात पूर्ण करून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी प्रवेश निश्चित केला होता. डरबन येथे रविवारी डोंगराळ भागात कॉम्रेड मॅरेथॉनसाठी जगभरातून स्पर्धत दाखल झाले होते. ही मॅरेथॉन १२ तासांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असते. सुषमा रेपे यांनी ९० किमी मॅरेथॉन ११ तास २२ मिनिटांत यशस्वी पूर्ण केली.
तीन वर्षे तयारी
सुषमा रेपे यांनी जवळपास तीन वर्षापासून कॉम्रेड मॅरेथॉनची तयारी सुरू केली होती. दररोज त्यासाठी सराव सुरू होता. मेहनत आणि तीव्र इच्छाशक्तीमुळे त्यांना यश मिळाले. ‘अर्हता ग्रुप’ कोल्हापूर येथील प्रशिक्षक आशिष व पंकज रावळू यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सांगली कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, निरीक्षक अमित गुरव यांचे प्रोत्साहन मिळाले.