Sangli: पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही जीवनयात्रा संपविली, जत येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:24 IST2025-07-09T19:24:35+5:302025-07-09T19:24:58+5:30
नुकतीच झाली होती कारागृहातून सुटका

Sangli: पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनेही जीवनयात्रा संपविली, जत येथील घटना
जत : जत येथील पत्रकारनगरमधील प्रकाश कामगोंडा नागराळे (वय ३०) या तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ८) दुपारी घडली. जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेने जत शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रकाश हा जत नगर परिषदेच्या सेवेत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याची पत्नी प्रतीक्षा हिने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल प्रकाशचे सासरे तथा प्रतीक्षाचे वडील राजशेखर भीमाशंकर बिराजदार (रा. सोलापूर) यांनी प्रकाश व त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. माहेरून पैसे आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी प्रतीक्षाचा छळ केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
त्यानुसार जत पोलिसांनी प्रकाशसह त्याचे वडील कामगोंडा, आई निंबव्वा यांना अटक केली. होती. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी व नंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. प्रकाशच्या विवाहित बहिणी प्रमिला जनमेजय बिराजदार व प्रियंका पाटील यांचेही नाव गुन्ह्यात दाखल आहे, मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. महिनाभरापूर्वी न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर तिघेही जामिनावर सुटून घरी परतले होते. तेव्हापासून प्रकाश विमनस्क अवस्थेत होता. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच शहरात खळबळ उडाली. याची नोंद रात्री उशिरा जत पोलिस ठाण्यात झाली.
रुग्णालयाच्या आवारात झाली होती मारहाण
प्रकाश व प्रतीक्षा यांचा विवाह चार ते पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. मे महिन्यात प्रतीक्षाने राहत्या घरी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यावेळी सोलापूरहून आलेल्या सासरच्या संतप्त नातेवाइकांनी प्रकाश व त्याच्या आई-वडिलांना जत ग्रामीण रुग्णालयाच्या आवाराच्या मारहाण केली होती. प्रतीक्षाच्या मृतदेहावर पाटील कुटुंबीयाच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दीड वर्षांच्या मुलीला घेऊन प्रतीक्षाचे आई-वडील सोलापूरला गेले होते.