सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:31 IST2026-01-13T17:31:41+5:302026-01-13T17:31:56+5:30

किमान चार महिन्यांची प्रतीक्षा, तासगावमध्ये सर्वाधिक ३९ ग्रामपंचायती, उन्हाळी परीक्षेनंतरच मतदान

Administrator rule will come to 155 gram panchayats in Sangli district | सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासकराज

सांगली : जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. त्यांच्या निवडणुका तातडीने होण्याची शक्यता तूर्त नाही. त्यामुळे तेथे प्रशासकाची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या ग्रामपंचायतींना निवडणुकांसाठी किमान चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

त्यामुळे त्यांच्या निवडणुकांचीही तयारी आयोगाला करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबल्यास या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही लांबणार आहेत. तेथे प्रशासक नेमावा लागेल.

सद्य:स्थितीला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्याच निवडणुकांचा घोळ मिटत नसल्याने ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाला फुरसत मिळण्याची चिन्हे नाहीत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात सरासरी पंधरवड्याला एखादी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होत आहे. निवडणूक आयोग याच निवडणुकीच्या गुंत्यात अडकून पडला आहे. या स्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका तूर्त लांबणीवर टाकणे हाच पर्याय आयोगापुढे असेल.

फेब्रुवारीमध्ये मुदत संपत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तेथे निवडणुकीसाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. हे लक्षात घेता तेथील निवडणुका लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. तेथील उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी किंवा पंचायत समितीतील विस्ताराधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त्या मिळणार आहेत. प्रशासकाला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी मिळू शकतो.

फेब्रुवारी महिन्यात १२ वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर १० वीच्या परीक्षा व त्यानंतरच्या टप्प्यात उर्वरित सर्व परीक्षांचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे मतदान केंद्रांसाठी शाळा, महाविद्यालये उपलब्ध होणार नाहीत. या स्थितीत परीक्षा संपल्यावर व पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका उरकाव्या लागणार आहेत. अन्यथा, पावसाळा संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरशिवाय वेळ मिळणार नाही.

सर्वाधिक ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात

फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या सर्वाधिक म्हणजे ३९ ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात आहेत. त्या खालोखाल जतमध्ये २९, मिरजमध्ये १७, खानापुरात १३ ग्रामपंचायती आहेत. शिराळा आणि वाळवा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी २ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीत संपत आहे.

अशा आहेत ग्रामपंचायती

मिरज - १७, अप्पर सांगली - ९, जत - २९, कवठेमहांकाळ - ११, तासगाव ३९, खानापूर १३, आटपाडी - १०, पलूस - १४, कडेगाव - ९, शिराळा - २, वाळवा - २

Web Title : सांगली जिले की 155 ग्राम पंचायतों पर प्रशासक राज जल्द

Web Summary : सांगली की 155 ग्राम पंचायतों का कार्यकाल फरवरी में खत्म। चुनाव में देरी के कारण प्रशासक नियुक्त होंगे। जिला परिषद चुनाव में देरी का असर ग्राम पंचायत चुनावों पर। तासगांव में सर्वाधिक ग्राम पंचायतें प्रभावित।

Web Title : Administrator Rule Imminent for 155 Gram Panchayats in Sangli District

Web Summary : Elections unlikely for 155 Sangli gram panchayats as terms end in February. Administrators will be appointed due to delays. Zilla Parishad election delays impact the gram panchayat polls. Tasgaon has the highest number of gram panchayats affected.