Sangli: कवठेएकंदला परंपरेच्या मांडवात मृत्यूचे तांडव!, स्फोटाच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:42 IST2025-10-01T19:41:07+5:302025-10-01T19:42:19+5:30
नयनरम्य देखाव्यांची जीवघेणी स्पर्धा

Sangli: कवठेएकंदला परंपरेच्या मांडवात मृत्यूचे तांडव!, स्फोटाच्या घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर
दत्ता पाटील
तासगाव : कवठेएकंद श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षांची आहे. या परंपरेला अलीकडच्या काही वर्षात व्यावसायिक आणि जीवघेण्या स्पर्धेने धक्के देत परंपरेच्या मांडवात मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. दुर्घटनांमध्ये अनेक जीव गमवावे लागले. दोन दिवसापूर्वी झालेल्या जीवघेण्या स्फोटाने तालुक्यातील प्रशासन ॲक्शन मोडवर आले. मात्र लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर मौन धारण केले. त्यामुळे जीवघेण्या परंपरेला लगाम घालणार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.
गावात स्फोट झाल्यानंतर महसूल आणि पोलिस प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस केली. तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी बैठकांचा धडाका लावला. पोलिस आणि महसूल पथकाने गावातील दारू शोभा मंडळांच्या अड्ड्यांची तपासणी सुरू केली आहे.
वाचा : कवठे एकंदला शोभेच्या दारुचे काम करताना स्फोट, सहाजण जखमी
मात्र हे सगळे होत असताना गावापासून जिल्ह्यापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर मौन धारण केले आहे. गावात दर दोन, चार वर्षांनी जाणारे बळी हे याच सामाजिक अनास्थेने घेतलेले बळी आहेत. केवळ परंपरेच्या नावाखाली सुरू असलेला जीवघेणा खेळ नियमात बसून परंपरेला विधायकतेची जोड दिली, तर कवठेएकंदकरांची ही परंपरा अनंतकाल नावलौकिकास प्राप्त होईल. अन्यथा मृत्यूचे तांडव असेच सुरू राहून परंपरेला धक्के बसत राहतील.
मंडळाकडून प्रत्येकी ३० ते ४० किलो दारूचा वापर
दारू शोभा मंडळाकडून नयनरम्य देखावे तयार करण्यासाठी कच्चा मागून फटाक्याची दारू तयार केली जाते. त्यासाठी अपवाद वगळता बहुतांश मंडळांकडून ३० ते ४० किलो फटाक्यांची दारू वापरली जाते.
नयनरम्य देखाव्यांची जीवघेणी स्पर्धा
दारू शोभा मंडळांच्या जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. आतषबाजीत नयनरम्य रंगांची उधळण होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकाराचे कलर दारूत मिक्स करण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर होऊ लागला आणि स्फोटाला या गोष्टी कारणीभूत ठरू लागल्या.
कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे गौडबंगाल
फटाक्यांची दारू तयार करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट, कोळसा आणि गंधक वापरले जाते. मात्र या फटाक्याच्या दारूची आतषबाजी करताना वेगवेगळे रंग मिळावेत यासाठी घातक केमिकलचाही समावेश केला जातो. दसऱ्याच्या काळात प्रत्येक मंडळाकडे मोठ्या प्रमाणात दारू साठा होत असताना यासाठी उपलब्ध होणारा कच्चा माल कुठून येतो, याकडे प्रशासनाचा कानाडोळा होतो.
शेकडो वर्षांची परंपरा
श्री सिद्धराज मंदिरातून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या देवघर ठिकाणापर्यंत श्री सिद्धराज महाराजांची पालखी दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी नेली जाते. चारशे वर्षांपूर्वी रात्री जंगली प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून आतषबाजी करत पालखी नेण्याची प्रथा निर्माण झाली. पुढे हीच प्रथा कवठेएकंदची परंपरा बनली. कवठेएकंदकरांच्या कलेने त्याचा देशभर लौकिक केला.
नावाजलेल्या परंपरेची जीवघेणी वाटचाल
कवठेएकंदची आतषबाजी देशभर नावाजली. मात्र मागील २५ वर्षांत या परंपरेची जीवघेणी वाटचाल सुरू झाली. परंपरेनुसार काळ्या दारूची आतषबाजी व्हायची. मात्र अलीकडच्या काळात काळ्या दारूत वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण करण्यासाठी अत्यंत घातक अशा रासायनिक मिश्रणांचा वापर होऊ लागला. त्यातूनच स्फोट होण्याचे आणि जीव जाण्याचे प्रमाण देखील वाढले. मागील २५ वर्षांत तब्बल ३५ पेक्षा जास्त लोक या जीवघेण्या परंपरेचे बळी ठरले आहेत.
दारू शोभा मंडळांची संख्या
कवठेएकंद : ७०
नागाव (क.) : ४३