बोगीतील दंगेखोर प्रवाशांना रेल्वे प्रशासन लावणार चाप, नियमावली जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 16:12 IST2022-01-22T15:49:01+5:302022-01-22T16:12:04+5:30
रेल्वेतील काही दंगेखोर प्रवाशांमुळे सहप्रवाशांच्या त्रास होतो.

बोगीतील दंगेखोर प्रवाशांना रेल्वे प्रशासन लावणार चाप, नियमावली जारी
सांगली : रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात सुरक्षित आणि शांत झोपेसाठी सामान्यत: रेल्वेला पसंती दिली जाते. पण रेल्वेतील काही दंगेखोर प्रवाशांमुळे सहप्रवाशांच्या त्रास होतो. मोबाइलवर मोठमोठ्याने गाणी लावणारे किंवा गप्पांची मैफल जमवणारे उपद्रवी प्रवासांमुळे इतर प्रवासांची झोपमोड होते. याबाबत तक्रारी वाढल्याने रेल्वेने नियमावली जारी केली असून दंगेखोर प्रवाशांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार रात्रीच्या प्रवासात मोबाइलवर मोठमोठ्याने गाणी लावता येणार नाहीत. चार-चौघांना गोळा करुन गप्पाष्टके रंगवता येणार नाहीत. दहानंतर प्रखर दिवे बंद करुन रात्रदिवेच सुरु ठेवता येतील. रात्रीच्या एक्सप्रेसमध्ये ड्युटी बजावणाऱ्या तिकीट तपासनीस, पेन्ट्री कर्मचारी, सफाईगार, सुरक्षा दलाचे जवान, पोलीस, कोच कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या झोपेची खबरदारी घेऊन काम करावे लागेल.
अनेकदा काही टारगट तरुण बोगीच्या पायऱ्यांवर बसून गप्पांचे फड रंगवितात, मोबाइलच्या स्पीकरवरुन गाण्यांचा दणदणाट करतात, त्यांनाही चाप लावण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. आरक्षणासाठी अतिरिक्त पैसे देऊन रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शांत झोपेचा अधिकार आहे अशी रेल्वेची भूमिका आहे.
प्रवाशांना करता येईल तक्रार
रात्रीच्या प्रवासात बोगीमध्ये दंगा सुरु असल्यास प्रवाशी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करु शकतील. त्यानंतर संबंधित `दंगेखोर` प्रवाशांना कर्मचारी सूचना देतील. प्रसंगी कायदेशीर कारवाईदेखील होईल. ज्येष्ठ नागरीक, एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी व दिव्यांगांना गरजेनुसार मदत करावी अशा सूचनाही रेल्वेने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.