निवास पवारशिरटे : येडेमच्छिंद्र (ता.वाळवा) येथील केशवराज खंडागळे या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा शहरात १ जानेवारीला अपघाती मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या मुलाच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बारावी परीक्षेच्या तोंडावरच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुणवंत खंडागळे यांचा केशवराज हा नातू होता. त्याला चांगले शिक्षण मिळावे आणि आयुष्यात त्याने भरारी घ्यावी यासाठी आजोबांनी जीवापाड मेहनत घेतली. त्याच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. चांगल्या शिक्षणासाठी दहावीनंतर कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये पाठविले. केशवराजची बहीण वैष्णवी कराडमध्ये शिकत आहे. शेती करणारे वडील अमोल काही दिवस कोटा येथे केशवराजसोबत, तर वैष्णवीसाठी काही दिवस गावात राहत होते. केशवराजची आई रूपा या मात्र मुलासोबत कोटा येथेच राहत होत्या.३१ डिसेंबरला केशवराज घरातून बाहेर पडला. लवकरच परत येतो असे त्याने आईला सांगितले होते. पण रात्री उशिरापर्यंत न परतल्याने आईने शोध सुरू केला. कोटा येथील ओळखीच्या मराठी माणसांची मदत घेतली पण तो सापडला नाही. त्यांनी कोटा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ही बातमी कळताच वडील अमोल हेदेखील त्वरित कोटाकडे रवाना झाले. याचदरम्यान कोटापासून दिल्लीच्या दिशेने सुमारे ८० किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळांवर केशवराजचा मृतदेह सापडला. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खंडागळे कुटुंबासाठी हा धक्का सहनशक्तीच्या पलीकडे ठरला.
मृतदेहासोबत वडिलांचा २२ तासांचा प्रवासकेशवराजचा मृतदेह गावाकडे आणून अंत्यविधी करण्यात आले. एकुलत्या मुलाच्या मृतदेहासोबत रुग्णवाहिकेतून २२ तास प्रवास करण्याची वेदनादायी वेळ वडील अमोल यांच्यावर आली. येडेमच्छिंद्र येथे आजोबा गुणवंत यांना नातवाच्या अपघाती मृत्यू समजल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला आहे, त्यातून ते अजूनही सावरू शकले नाहीत. नातवाचा उच्च अधिकारी बनल्याचे पाहण्याचे त्यांचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे.
अपघात की घातपात?केशवराजचा मृतदेह रुळांवर सापडल्याने हा अपघात आहे की त्याचा घातपात करण्यात आला? याविषयी कुटुंबियांच्या मनात सांशकता आहे. राजस्थान पोलिसांसोबत चर्चेनंतरच नेमका खुलासा होणार आहे.