सांगलीत आयर्विनजवळील नवीन पुलाच्या उद्घाटनानंतर तासाभरात अपघात, उलटसुलट चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:35 IST2025-11-07T18:35:16+5:302025-11-07T18:35:36+5:30
पदपथाशेजारी असणाऱ्या छोट्या कठड्याचा अंदाज न आल्याने मोटार धडकली

सांगलीत आयर्विनजवळील नवीन पुलाच्या उद्घाटनानंतर तासाभरात अपघात, उलटसुलट चर्चा सुरू
सांगली : येथील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर बांधलेल्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी तासाभरात मोटारीचा अपघात झाला. पुलावरील पदपथाच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला मोटार धडकून कठड्याचा कोपरा फुटला. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.
आयर्विन पुलाला समांतर पूल उभारण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. नवीन पुलाचे काम सुरू करण्यापूर्वीच आयर्विन पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. नवीन पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर किरकोळ काम बाकी असल्यामुळे पुलाच्या उद्घाटनाचे काम रेंगाळले होते. गुरुवारी सायंकाळी पुलाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
उद्घाटनंतर तासाभरात पुलावर वर्दळ दिसू लागली. एक वृद्ध मोटार (एमएच १० इए ४२४०) घेऊन जात होते. त्यांना पदपथाशेजारी असणाऱ्या छोट्या कठड्याचा अंदाज आला नाही. तसेच अंधार असल्याने मोटार कठड्याच्या कोपऱ्याला धडकली. त्यामुळे कठड्याचा कोपरा फुटला. मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने चालवणाऱ्या वृद्धास दुखापत झाली नाही. मात्र, उद्घाटनानंतर तासाभरातच अपघात झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती. तत्काळ क्रेन मागवून मोटार उचलून नेण्यात आली.