लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : महापुराची पाहणी करून कोल्हापूरकडे जात असताना अंकलखोप (ता.पलूस) येथे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या माेटारीस अपघात झाला. यामध्ये फौजदार आर. डी. सुर्वे गंभीर जखमी झाले, तर चालक सचिन सूर्यवंशी हे किरकाेळ जखमी झाले. मंगळवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा दौरा पूरग्रस्त भागात सुरू होता. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान अंकलखोप येथे पूरग्रस्तांना भेट देऊन ते दुपारी १च्या विमानाने कोल्हापूरहून मुंबईला जाणार होते. अंकलखोपहून कोल्हापूरकडे गाड्यांचा ताफा शेतातील रस्त्यावरून जात होता. यावेळी अचानक एक व्यक्ती रस्त्यावर आली. चालक सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखून माेटार (क्र. एमएच १० एन ९६०४) बाजूला घेतली. पण वेगावर नियंत्रण न करता आल्याने त्यांचा ताबा सुटला व माेटार रस्त्याच्या बाजूला उलटली. माेटारीच्या धडकेत रस्त्याच्या कडेला असणारा विजेचा खांब जमिनीतून मोडून पडला. डॉ. कदम यांनी तातडीने ताफा थांबवून दाेघाही जखमींना स्वत:च्या वाहनातून त्यांना आष्टा (ता. वाळवा) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नाेंद भिलवडी पाेलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहायक निरीक्षक कैलास कोडग करत आहेत.