मंडल अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने ग्रामस्थ त्रस्त
By Admin | Updated: February 2, 2015 00:15 IST2015-02-01T23:35:46+5:302015-02-02T00:15:05+5:30
जतच्या आम सभेत तक्रार : प्रशासनाकडून चावडीवर फलक लावण्याचा ‘उपाय’

मंडल अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने ग्रामस्थ त्रस्त
जत : जत पंचायत समिती आम सभेत गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली होती. यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावचावडीसमोर महसूल प्रशासनाने फलक लावले आहेत.गावकामगार तलाठी व मंडळ अधिकारी नागरिकांना वेळेवर भेटत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी पैसे घेतले जात आहेत. खरेदी-विक्री दस्ताची नोंद न्यायप्रविष्ट बनविली जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी ग्रामसभेत व्यक्त केल्यानंतर यावर गरमा-गरम चर्चा झाली होती. परंतु तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी सर्वच मंडल अधिकारी आणि काही गावकामगार तलाठी गेले होते. त्यामुळे ग्रामसभेत त्यांना जाब विचारण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळाली नाही.
तालुक्यातील प्रत्येक गावचावडीसमोर गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी ज्या दिवशी उपस्थित राहणार आहेत, तो वार आणि तारीख याशिवाय प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि गावकामगार तलाठी यांचा मोबाईल नंबर असलेले फलक लावले जातील. नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी पैसे देऊ नयेत. जर कोण पैसे मागत असेल तर मोबाईलद्वारे किंवा लेखी तक्रार करावी, संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी ग्रामसभेत दिले होते.
त्यानुसार दोनच दिवसात प्रत्येक गावचावडीसमोर फलक लावून त्यांनी महसूल विभागाचा कारभार पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)