Sangli: दरीबडची येथील लांडग्याला रेबीजची लागण, पाच जणांवर केला होता हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:59 IST2024-06-21T13:57:29+5:302024-06-21T13:59:13+5:30
जखमी व्यक्तींची प्रकृती चांगली; चौघांना डिस्चार्ज, दोघांवर उपचार सुरू

Sangli: दरीबडची येथील लांडग्याला रेबीजची लागण, पाच जणांवर केला होता हल्ला
दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी लांडगा गावापासून ४ किमी अंतरावर रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ मृत अवस्थेत आढळून आला. त्याला रेबीजची लागण झाली होती. रेबीजची लागण झाली असल्याने शवविच्छेदन केले नाही. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृत लांडग्याचे रात्री दहन केले. सर्व पाचही जखमी व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. गावातील सर्व २९ जखमी पशुधनावर पशुवैद्यकीय अधिकारी कुणाल कांबळे यांनी उपचार केले.
पूर्व भागातील दरीबडची गावालगत वन विभागाचे जंगल आहे. बुधवारी सकाळी पिसाळलेला लांडग्याने पाच जणांवर हल्ला केला होता. तसेच २९ जनावरांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला. सर्व जखमी व्यक्ती मिरज व सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील चार व्यक्तींना उपचार करून डिस्चार्ज दिला आहे. सध्या आनंद गेजगे, पार्वती घागरे यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.
नुकसानभरपाई तत्काळ देणार
जखमी व्यक्ती, जनावरांच्या औषधांची बिले वनविभागाला सादर करावीत. वनविभागाला माहिती देऊन अर्ज करावा. सर्व जखमी व्यक्ती व पशुधन यांना वनविभागामार्फत शासननिर्णयप्रमाणे नुकसानभरपाई तत्काळ देण्यात येणार असल्याची माहिती जत वनक्षेत्रपाल प्रवीण पाटील यांनी दिली.
अन् आनंदा गेजगे बचावले
आनंदा गेजगे हे गावालगत शेतामध्ये भुईमूग टोकण्याचे काम करीत होते. ते खाली बसून काम करीत असतानाच त्यांच्यावर लांडग्याने झडप घातली. लांडग्याने त्यांच्या चेहऱ्यावरच हल्ला केल्याने ते जमिनीवर कोसळले. काही ग्रामस्थांनी लांडग्याला दगडाने मारून त्याला हुसकावून लावले. त्यामुळे आनंदा गेजगे थोडक्यात बचावले.