सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:08 IST2024-12-19T19:06:08+5:302024-12-19T19:08:20+5:30
२४ जणांचा संघ दिल्लीला रवाना

सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी
सांगली : सांगली शिक्षणसंस्थेच्या विश्वविक्रमी ‘लेझीम’चे सादरीकरण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले जाणार आहे. दिल्ली येथे २६ डिसेंबरला होणाऱ्या ‘भारत मंडपम’ कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर या लेझीम खेळाचे प्रदर्शन होणार आहे. सांगली शिक्षण संस्थेच्या १८ विद्यार्थिनी यात सहभागी होणार असून यामुळे सांगलीचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचणार आहे.
शिक्षण संस्थेचे कार्यवाह शि. वा. गोसावी, संचालक विजय भिडे, माजी अध्यक्ष नितीन खाडिलकर, अमोल करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, या कार्यक्रमासह २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या परेडवेळीही सांगली शिक्षण संस्थेच्या ८० मुलींच्या संघास लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्याचा बहुमानही मिळाला आहे.
वीर बाल दिवस सांस्कृतिक कार्यक्रमातंर्गत भारत मंडपम हा महोत्सव नवी दिल्लीत मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यासाठी क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र आणि सांगली शिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातून लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे. यासाठी संस्थेतील १६ मुली, एक संघप्रमुख, व्यवस्थापक, चार वादक असा २४ जणांचा संघ मंगळवारी दिल्लीला रवाना झाला आहे.
भिडे म्हणाले, लेझीम हा एक खेळ आहे. शरीराच्या पायापासून ते केसापर्यंत व्यायाम होतो. करमणूकही होते. सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त २६ जानेवारी २०१२ मध्ये लेझीम खेळ प्रकारात साडेसात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विश्वविक्रम नोंदविला होता. या सोहळ्याचे हजारो सांगलीकर साक्षीदार होते. असा हा लेझीमचा खेळ दिल्लीत पतंप्रधान मोदी यांच्यासमोर व्हावा अशी इच्छा होती. ही संधी मिळाली आहे.
यात संघप्रमुख हरिहर भिडे, वादक माया खटके, शंतनू ताम्हणकर, अथर्व कांबळे, बिंदुमाधव शिंदगी, व्यवस्थापक सचिन गद्रे यांच्यासह विद्यार्थिनी श्रेया जोशी, निर्झरा माळी, ईश्वरी शिकलगार, कृतिका माने, वेदा कुलकर्णी, प्रीती चव्हाण, श्रुतिका चव्हाण, संस्कृती शिंगे, सिद्धी माळकर, श्रुती भांडवले, केतकी नांदवडषकेर, भार्गवी सगरे, पायल यमगर, साक्षी कुलकर्णी, भाग्यश्री माळी, हर्षदा शिंदे, अन्विता पाटील आदी सहभागी झाले आहेत.