Sangli: थक्क झाले वारकरी, श्वान करतोय पंढरीची वारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 18:04 IST2025-07-05T18:04:39+5:302025-07-05T18:04:59+5:30
वारकऱ्यांचा जिव्हाळा

Sangli: थक्क झाले वारकरी, श्वान करतोय पंढरीची वारी
सहदेव खोत
पुनवत : ‘भेटी लागी जिवा, लागलीसे आस’, तुकोबारायांच्या या अभंगातील ओळीप्रमाणे सध्या हजारो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या ठिकठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. सर्व वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे. मात्र पुनवत (ता. शिराळा) येथून गेलेल्या पायी दिंडीतून असाच एक मुका जीव वारकऱ्यांच्या बरोबर पंढरीची वारी करत आहे. तो जीव आहे एक भटका श्वान. वारकऱ्यांसमवेत रेड येथून हा श्वान दिंडीत सामील झाला आहे. विशेष म्हणजे एका पायाने तो विकलांग असूनही दिंडीत चालत आहे. श्वानाच्या या अनोख्या वारीने वारकरीही भारावून गेले आहेत.
पुनवत येथून आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची पायी दिंडी दिनांक २२ जून रोजी रवाना झाली. ही दिंडी रेड या गावाजवळ आल्यानंतर एक भटका श्वान दिंडीत सामील झाला. थोड्या अंतरानंतर तो परत फिरेल, असे वारकऱ्यांना वाटले मात्र तो चालतच राहिला. प्रत्येक जीवामध्ये देवाचे अस्तित्व असते. अशा भावनेने या वारकऱ्यांनी या श्वानाला दिंडीबरोबर चालू दिले. सलग बारा दिवस हा श्वान वारकऱ्यांबरोबर दिंडीतून पंढरपूरच्या दिशेला जात आहे. प्रत्येक मुक्कामात तो वारकऱ्यांच्या सोबत थांबत आहे. वारकऱ्यांनी त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातला असून तो दिंडीत अत्यंत शिस्तीने चालत आहे व सर्वांचे लक्ष वेधत आहे.
वारकऱ्यांचा जिव्हाळा
पंढरीच्या वारीत सोबत करणारा हा मुका जीव सुरक्षित रहावा, यासाठी वारकऱ्यांनीही त्याची काळजी घेतली आहे. प्रत्येक दिवशी त्याच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था केली जात आहे. मुक्कामात त्याचे इतर श्वानांपासून संरक्षण केले जात आहे. जणू वारकऱ्यांना त्याचा लळा लागला आहे.
हा श्वान आमच्यासोबत शिराळ्यापासून चालत आहे. जणू तो आमचा एक आगळावेगळा वारकरी आहे. पंढरपुरात विठुरायाचे दर्शन झाल्यानंतर त्याला आम्ही सोबत परत मूळ ठिकाणी आणणार आहोत. - सुनील खवरे, वारकरी खवरेवाडी