Sangli: बांधकाम साइटवर अपघात, बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; पोलिसाला अटक
By घनशाम नवाथे | Updated: December 30, 2024 19:28 IST2024-12-30T19:28:19+5:302024-12-30T19:28:41+5:30
सांगली : बांधकाम साइटवर झालेल्या अपघातानंतर बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल विश्रामबाग ...

Sangli: बांधकाम साइटवर अपघात, बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; पोलिसाला अटक
सांगली : बांधकाम साइटवर झालेल्या अपघातानंतर बालकामगार ठेवल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यातील कर्मचारी शेखर जयवंत पाटणकर (वय ३८, रा. सांगली) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
तक्रारदार हे बांधकाम साइटवर सळी बांधण्याचे कंत्राट घेतात. दि. ७ डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी कंत्राट घेतलेल्या इचलकरंजी येथील बांधकाम साइटवर एक अल्पवयीन बालक त्याचे नातेवाईक अपघातात जखमी झाले होते. जखमींवर विजयनगर येथे भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. हॉस्पिटलमधून विश्रामबाग पोलिस ठाण्यात जखमींबाबत माहिती देण्यात आली होती. त्यासाठी पोलिस नाईक शेखर पाटणकर हा गेला होता. अपघातामध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी व बालकाचा जबाब तक्रारदार यांच्या बाजूने घेण्यासाठी पोलिस नाईक पाटणकर याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीनुसार दि. १० डिसेंबर रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत पाटणकर याने २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाटणकर याने लाच स्वीकारली नाही. परंतु, त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला होता. तेथून परवानगी मिळाल्यानंतर पाटणकर याला अटक करून विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे आदींच्या पथकाने कारवाई केली.