मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:33 IST2025-10-28T18:33:15+5:302025-10-28T18:33:59+5:30
विभूतवाडी येथे भाजपचा संवाद मेळावा

मला राजकीय चक्रव्यूहात अडकवण्याचा डाव आखला - आमदार पडळकर
आटपाडी : ‘राजकारणात कोणी आडवे येत असेल तर त्याला तुडवलेच पाहिजे. विरोधकांना वाटतं गोपीचंद पडळकर यांची गंमत होईल, पण आता गंमत त्यांचीच होईल. मला अभिमन्यूच्या चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय; मात्र या चक्रव्यूहातून मला बाहेर काढणारी जनता आहे,’ असा ठाम विश्वास जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे सोमवारी आयोजित भाजपा पक्षप्रवेश व पक्ष संवाद मेळावा आणि विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अक्षयराज माने, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संग्राम माने, माजी सभापती जयवंत सरगर आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात प्रा. नारायण खरजे, माजी सभापती कुसुमताई मोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, एकदिलाने आणि जिद्दीने काम करा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच चंद्रकांत पावणे यांनी आभार मानले.