सांगली : रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळाल्याचा बोगस मेसेज बनवून प्रवाशांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भामट्याला रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. प्रवीणकुमार मधुकर लोंढे (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे. त्याने अशाप्रकारे आणखी किती प्रवाशांना गंडा घातला आहे याची माहिती पोलिस घेत आहेत.ही कारवाई पुणे रेल्वे स्थानकात सोमवारी (दि. २३) करण्यात आली. पुणे - जम्मूतावी झेलम एक्सप्रेसमध्ये एकाच आसनाचे तिकीट दोघांना मिळाल्यानंतर ही बनवाबनवी उघडकीस आली. सुरक्षा दलाने माहिती दिली की, रेल्वे स्थानकात तिकिटासाठी धडपडणाऱ्या प्रवाशांना लोंढे हेरायचा. अधिकाऱ्यांमार्फत तिकीट मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांची माहिती व मोबाइल क्रमांक घ्यायचा. नंतर तिकीट कन्फर्म झाल्याचा बोगस मेसेज मोबाइलवर पाठवायचा. त्यासाठी पैसे घ्यायचा. प्रत्यक्षात त्याने कन्फर्म करून दिलेले कथित आसन रेल्वेने अगोदरच अन्य प्रवाशाला अधिकृतरीत्या दिलेले असायचे. त्यामुळे रेल्वेत दोन प्रवाशांकडे कन्फर्म तिकिटाचा मेसेज असायचा. त्यासाठी त्यांच्यात भांडणे लागायची. तोपर्यंत लोंढे गायब झालेला असायचा.झेलम एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासनीस जी. एस. राजापुरे यांना ही बनवेगिरी आढळली. त्यांनी प्रशासनाला कळविले. तपासासाठी सुरक्षा दलाचे निरीक्षक सुनील कुमार यादव, संतोष जायभाये, युवराज गायकवाड आणि सायबर सेलच्या तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने बोगस मेसेज पाठविलेल्या मोबाइल क्रमांकाच्या आधारे प्रवीणकुमार लोंढे याला पकडले. त्याने १२ डिसेंबर रोजीही एका प्रवाशाला अशाच प्रकारे गंडविल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याविरोधात पुणे रेल्वे पोलिसांत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३१६(२), ३१८ (४), नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपनिरीक्षक नाझरे अधिक तपास करीत आहेत.
अशी झाली फसवाफसवीलोंढे याने एका प्रवाशाला पाठविलेल्या संदेशामध्ये पीएनआर क्रमांक ८४५१२३६९४७, गाडी क्रमांक ११०७७, झेलम एक्सप्रेस, प्रवासाचा दिनांक १७ डिसेंबर २०२४, स्लीपर श्रेणी, पुणे ते नवी दिल्ली, प्रवासी दीपेंद्र व एक, आसन क्रमांक एस २ - ६३ आणि एस २ - ७१, एकूण प्रवास भाडे १९८० रुपये आणि एजंट चार्ज असा तपशील होता. कन्फर्म तिकिटाचा मेसेज मिळाल्यानंतर प्रवाशाकडून लोंढे याने २००० रुपये घेतले. गाडीमध्ये प्रत्यक्ष प्रवासावेळी या आसनावर वेगळाच प्रवासी आला. या दोघांत आसनासाठी भांडण पेटले. रेल्वेने ही सीट आपल्यालाच दिल्याचा दोघांचाही दावा होता. हे भांडण तिकीट तपासणीसापर्यंत पोहोचले. त्यांनी दोघांचीही तिकिटे तपासली असता, दीपेंद्रचे तिकीट बोगस असल्याचे स्पष्ट झाले.