माळवाडी येथील घरात शिरला बिबट्या; महिलेच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:57 IST2025-08-18T18:55:28+5:302025-08-18T18:57:49+5:30
वनविभागाची तासाभरात यशस्वी रेस्क्यू मोहीम, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

माळवाडी येथील घरात शिरला बिबट्या; महिलेच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!
विकास शहा
माळेवाडी-कोकरूड (ता. शिराळा): येथील गोसावी वस्तीतील एका घरात सोमवारी सकाळी बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली. घरातील महिलेने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला खोलीतच कोंडल्याने अनर्थ टळला. यानंतर, वनविभागाच्या पथकाने अवघ्या एका तासात धाडसी मोहीम राबवून बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले. दीड वर्षांच्या या मादी बिबट्याला वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, गोसावी वस्तीत राहणारे अरुण गोसावी यांच्या घराच्या तळमजल्यावर जनावरांचा गोठा आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भक्ष्य आणि निवाऱ्याच्या शोधात असलेला बिबट्या सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घरात शिरला. अरुण गोसावी यांच्या पत्नी अश्विनी गोसावी या घरातील एका रिकाम्या खोलीत कपडे सुकवण्यासाठी गेल्या असता, त्यांना खोलीत बिबट्या दबा धरून बसल्याचे दिसले.
बिबट्याने गुरगुरत त्यांच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अश्विनी यांनी अजिबात न घाबरता मागे सरकत खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि त्याला कडी लावली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करून कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांच्या या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली.
वनविभागाची वेगवान कारवाई
घटनेची माहिती मिळताच उपवनरक्षक सागर गवते आणि सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल अनिल वाजे आणि रेस्क्यू टीम युन्नुस मणेर, सुशिलकुमार गायकवाड, गौरव गायकवाड, संतोष कदम, मोहन सुतार, बाबा गायकवाड आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
पथकाने घराच्या दारासमोर पिंजरा लावून, त्याच्याभोवती गवत आणि कापडाने अंधार तयार केला. त्यानंतर खिडकीतून बिबट्याला पिंजऱ्याच्या दिशेने जाण्यास भाग पाडले. अवघ्या पाच मिनिटांतच बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
नागरिकांची गर्दी आणि पोलिसांचे सहकार्य
बिबट्या घरात शिरल्याचे कळताच घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. अनेकजण धोकादायक पद्धतीने खिडकीजवळ जाऊन फोटो आणि व्हिडिओ काढत होते. चवताळलेला बिबट्या पंजा मारत ओरडत होता, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. बचावकार्यात अडथळा येत असल्याने कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्दीला दूर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून, वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
अश्विनी गोसावींच्या धाडसाचे कौतुक
अचानक समोर आलेल्या बिबट्याला पाहूनही न डगमगता अश्विनी गोसावी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे कुटुंबासह इतरांचेही प्राण वाचले.
नव्या रेस्क्यू व्हॅनचा यशस्वी 'श्रीगणेशा'
वनविभागाला काही दिवसांपूर्वीच नवीन रेस्क्यू व्हॅन मिळाली आहे. या व्हॅनचा उपयोग करून यशस्वीपणे रेस्क्यू केलेला हा पहिलाच बिबट्या ठरला आहे. या व्हॅनसाठी आवश्यक असलेले अतिरिक्त साहित्य मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.