Sangli: बिबट्या थेट घरात घुसला, कुटुंबाचा थरकाप उडाला; मांजर, कुत्र्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:37 IST2025-09-26T17:37:36+5:302025-09-26T17:37:55+5:30
नागरिकांत भीतीचे वातावरण

संग्रहित छाया
शिराळा (जि. सांगली) : तालुक्यातील बिऊर येथे एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने थेट घरात प्रवेश केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका घटनेत पाळीव मांजराचा पाठलाग करीत बिबट्या घरात घुसला, तर दुसऱ्या घटनेत घराच्या खोलीतून पाळीव कुत्रा उचलून नेला. या घटनांमुळे बिऊर आणि परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
शिराळा-कोकरूड रस्त्यालगत राहणारे किराणा व्यावसायिक सखाराम पाटील हे बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून घरी परतले. घरात ते एकटेच होते आणि टीव्ही पाहत बसले होते. त्याचवेळी त्यांचे पाळीव मांजर घाबरून घरात शिरले. मांजराच्या पाठोपाठ एक मोठा प्राणी घरात आल्याने, सुरुवातीला पाटील यांनी त्याकडे मांजर समजून दुर्लक्ष केले. मात्र, काही क्षणातच गुरगुरण्याचा आवाज ऐकून त्यांचे लक्ष गेले असता, तो बिबट्या असल्याचे समजले. पाटील घाबरून खुर्चीवरून उठताच झालेल्या आवाजाने बिबट्या पळून गेला.
या घटनेनंतर काही वेळातच, रात्री साडेआठच्या सुमारास, गावातील वस्तीत राहणारे प्रमोद पुजारी, किरण पुजारी व त्यांचे कुटुंबीय जेवण करीत असताना त्यांच्या घराच्या बाहेरील खोलीत बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. क्षणातच बिबट्याने कुत्र्याला उचलून अंधारात धूम ठोकली. एकाच रात्री घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.