Sangli: भरदिवसा ऊसतोड बैलगाड्यांच्या मागे लागला बिबट्या, कामगारांचा उडाला थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:28 IST2025-12-30T17:28:20+5:302025-12-30T17:28:45+5:30
चिंचणी मोहिते वडगाव रस्त्यावरील घटना

Sangli: भरदिवसा ऊसतोड बैलगाड्यांच्या मागे लागला बिबट्या, कामगारांचा उडाला थरकाप
देवराष्ट्रे : चिंचणी - मोहिते - वडगाव रस्त्यावर सोमवारी (दि. २९) सकाळी साडेसहा वाजता ऊसतोड कामगारांचा थरकाप उडवणारा दंगा सुरू झाला. पळापळा बिबट्या आला व ऊसतोड यासाठी आलेल्या बैलगाड्या मोहिते-वडगावच्या दिशेने वेगाने धावू लागले, कारण एकच यांच्या मागे बिबट्या लागला होता.
ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी मोहिते-वडगाव येथे निघाले होते. याच वेळेला रस्त्याने जाताना त्यांच्या मागे बिबट्या धावू लागला. कामगार घाबरून ओरडायला लागले तरीदेखील बिबट्या यांच्या मागेच धावू लागला. कामगार बोभाटा करतच रस्त्याने बैलगाड्या पळवू लागले. यावेळी माजी सरपंच विजय मोहिते यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली.
वनविभागाने सांगितले की, ज्या ठिकाणी ऊसतोड चालू आहे त्या ठिकाणी बिबट्याचे बछडे असण्याची शक्यता आहे. त्यांचा बचाव करण्यासाठी हा बिबट्या ऊसतोड मजुरांच्या मागे लागला असावा. पण या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ऊसतोड मजूर ऊस तोड करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.