दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड, अन् केलं पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 13:42 IST2022-09-27T13:41:20+5:302022-09-27T13:42:07+5:30
खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद

दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड, अन् केलं पलायन
इस्लामपूर : राजारामनगर (ता. वाळवा) येथे दारूच्या नशेत पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी दुपारी चार वाजता घडला. हे दाम्पत्य शेतमजूर असून ते जत तालुक्यातील उटगी गावचे रहिवासी आहेत.
जखमी रसिका मल्लेश कदम (वय २८, सध्या रा. आरआयटी गेट क्र. १ समोर) या महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती मल्लेश सिद्धाप्पा कदम (४०) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारी चार वाजता मल्लेश दारूच्या नशेतच घरी आला होता. यावेळी रसिका झोपलेली असताना तिच्याशी विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळी त्याने दगड घेऊन रसिकाच्या डोक्यात घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्याने पलायन केले. पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे अधिक तपास करत आहेत.