Sangli Crime: दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:18 IST2025-12-30T14:15:58+5:302025-12-30T14:18:57+5:30
एक लाख दहा हजाराचा दंड : विटा येथील न्यायालयात निकाल

Sangli Crime: दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार; नराधमास मरेपर्यंत सक्तमजुरी
विटा : दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी रमेश बाबूराव रणदिवे (वय ४०, रा. दिघंची-भिंगेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) या नराधमास विटा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण रामकृष्ण भागवत यांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत मरेपर्यंत सक्तमजुरी व एक लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास साध्या कैदेची शिक्षा देण्याचा आदेश केला.
आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन पीडितेची आई व बहीण दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी शेतात कामाला गेलेली होती. त्यावेळी नराधम रमेश रणदिवे याने अल्पवयीन पीडितेला बोरे आणण्याच्या बहाण्याने शेतात नेले. त्यावेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. ‘आईला सांगितलेस तर तुला जीवे मारीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेला घरी आणून सोडले.
दुपारी दीड वाजता पीडितेची आई घरी आल्यानंतर मुलगी जोरजोराने रडू लागली. आईने चौकशी केल्यानंतर नराधम रमेश रणदिवे याने केलेली घटना सांगितली. त्यावेळी पीडितेची दुसरी बहीण तेथेच होती. तिनेही आईला रमेश रणदिवे याने दोन महिन्यांपूर्वी आटपाडी बाजारात जायचे आहे, असे सांगून कॅनॉलजवळ आडोशाला विनयभंग केला. कोणाला सांगितलेस तर जीवे मारीन, अशी धमकी दिल्याचे सांगितले.
त्यानंतर दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींना घेऊन आईने आटपाडी पोलिस ठाणे गाठले. रमेश रणदिवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी नराधम रमेश रणदिवे यास दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पीडितांचा जबाब, पीडितांच्या आईची साक्ष झाली. अल्पवयीन मुली, तिच्या आईचा जबाब एकमेकांशी संगत होता. तसेच पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा वैद्यकीय अहवालही सादर करण्यात आला. त्यानुसार विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण भागवत यांनी नराधम रमेश रणदिवे यास भादवि कलम ३५४ व ३७६ (२)(एफ), ३७६(३) पोक्सोनुसार दोषी ठरवून मरेपर्यंत सक्तमजुरी व एक लाख १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची सर्व रक्कम अल्पवयीन पीडितेला देण्याचा आदेशही दिला.
खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. आरती आनंद देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. त्यांना आटपाडी पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण गुरव, राजेश गवळी तसेच सुनिता कांबळे, रेखा खोत, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन पीडितांना मिळाला न्याय...
दोन अल्पवयीन पीडितेवर दि. २९ ऑक्टोबर २०२१ ला लैंगिक अत्याचार झाला होता. त्याचा खटला विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रविकिरण भागवत यांच्यासमोर सुरू होता. सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी नराधम रमेश रणदिवेला शिक्षा ठोठावली. त्यामुळे दोन्ही अल्पवयीन पीडितांना ४ वर्षे २ महिन्यांनी न्याय मिळाला.