अजित पवार गटातील आमदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणं आलं अंगलट, वनविभागाकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:30 IST2025-02-06T18:29:04+5:302025-02-06T18:30:58+5:30
संयोजक राहुल बलकवडे आणि हत्ती मालक तासगावच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल

अजित पवार गटातील आमदारांची हत्तीवरुन मिरवणूक काढणं आलं अंगलट, वनविभागाकडून गुन्हा दाखल
तासगाव (जि. सांगली) : पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांची २ फेब्रुवारी रोजी पिरंगुट (ता. मुळशी) परिसरात येथे हत्तीवरून मिरवणूक काढली होती. मात्र, त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत वनविभागाने या मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे आणि हत्ती मालक तासगावच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल राहुल बलकवडे यांनी ही मिरवणूक काढत पिरंगुट परिसरात पेढे वाटले. यासाठी तासगावच्या श्री गणपती पंचायतन ट्रस्टचा हत्ती आणला होता. या मिरवणुकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल घेत, पुणे जिल्ह्याचे मानद वन्य जीवरक्षक यांनी अधिक माहिती घेत आयोजकांवर गुन्हा दाखल केला.
देवस्थानचा हत्ती कोणत्याही कार्यक्रमासाठी जाणार असेल, तर सरकारच्या सर्व परवानग्या घेऊनच आम्ही तो हत्ती पाठवितो. त्यामुळे आम्ही कायदा मोडला नाही. मात्र, ज्या लोकांनी कार्यक्रम आयोजित केला होता, त्या ठिकाणी नियोजनात चूक राहिली असेल, तर त्याच्याशी आमचं काही देणं-घेणं नाही. - राजेंद्र पटवर्धन, अध्यक्ष, श्री गणपती पंचायतन ट्रस्ट, तासगाव.