युद्धामुळे सांगली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील ७५० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:57 IST2026-03-16T15:56:30+5:302026-03-16T15:57:28+5:30

कामगारावर टांगती तलवार : गॅसपुरवठा विस्कळीत

750 industries in the industrial sector in Sangli district are on the verge of closure due to the war | युद्धामुळे सांगली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील ७५० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

युद्धामुळे सांगली जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रातील ७५० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

महालिंग सलगर

कुपवाड : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या झळा कुपवाड, मिरज एमआयडीसीसह बामणोली, सावळी या औद्योगिक वसाहतींना बसू लागल्या आहेत. औद्योगिक कमर्शियल गॅसचा पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील फौंड्री, इंजिनिअरिंगसह जवळपास ७५०  उद्योग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पूर्वी घेतलेल्या गॅसमुळे सध्या रडतखडत काही उद्योग सुरू असून येत्या काही दिवसांत तीव्र टंचाई भासून अनेक उद्योग बंद पडण्याची शक्यता आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार येण्याची शक्यता आहे.

कुपवाड, मिरज एमआयडीसीसह लगतच्या सावळी, बामणोली एमआयडीसीत फौंड्री, इंजिनिअरिंगसह फॅब्रिकेशन, पावडर कोटिंग, प्लास्टिक टाक्यासह इतर उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगामधून हजारो कामगार कार्यरत आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे देशात सध्या गॅसची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. शासनाने गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कमर्शियल गॅस सिलिंडर औद्योगिक वापरासाठी देण्यावर निर्बंध लादले आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून ही कपात करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. पूर्वी घेतलेल्या गॅसच्या सिलिंडरवर सध्या कसेबसे रडतखडत काही उद्योग सुरू असून तर काहींनी उद्योग बंद ठेवण्यात धन्यता मानली आहे. गॅससाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात या चिंतेने उद्योजक अक्षरश: हवालदिल झाले आहेत. या तुटवड्यामुळे उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर मराठा उद्योजक फाउंडेशन आणि बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशन यांच्यावतीने उद्योजकांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकीत दोन्ही संघटनांच्या सभासदांनी औद्योगिक कमर्शियल सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला, तर शेकडो उद्योग बंद पडून हजारो कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार येण्याची शक्यता बोलून दाखविली. या संदर्भात शासनस्तराबरोबरच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे.

मराठा उद्योजक फौंडेशनच्या बैठकीस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अजय देशमुख, प्रशांत देसाई, संजय खांबे, सुयश श्रीखंडे, शंकर रकटे, जयवंत माने, शरद नलवडे, रामदास चव्हाण, रूपेश सूर्यवंशी, श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या बैठकीस अध्यक्ष अनंत चिमड, उपाध्यक्ष सदाशिव मलगान, संजय ठेंगळे, बंडू घाडगे, सज्जाद पाकजादे, अभिजित गुजर, संतोष चव्हाण, जगन्नात माने, गणेश कोळी यांच्यासह इतर उद्योजक उपस्थित होते.

गेल्या दहा दिवसांपासून शासनाने औद्योगिक वापरासाठी कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला आहे. पूर्वी घेतलेला गॅसही संपत आला आहे. त्यामुळे सध्या टंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. सत्तर टक्के उद्योग बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना मराठा उद्योजक फौंडेशनच्यावतीने लेखी पत्र देण्यात आले आहे. - चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, मराठा उद्योजक फौंडेशन, सांगली.


औद्योगिक कमर्शियल सिलिंडरच्या तुटवड्यामुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची चिन्हे आहेत. सध्या टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत आयोजित बैठकीत उद्योजकांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाकडे लेखी मागणी केली आहे. त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शासनाकडे केली आहे. - अनंत चिमड, अध्यक्ष, बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशन, बामणोली.

Web Title : युद्ध से सांगली के उद्योग खतरे में: 750 इकाइयाँ बंद होने की कगार पर

Web Summary : अंतर्राष्ट्रीय संघर्ष के कारण गैस की कमी से सांगली का औद्योगिक क्षेत्र पंगु हो रहा है। कुपवाड़ और मिरज एमआईडीसी क्षेत्रों में फाउंड्री और इंजीनियरिंग फर्मों सहित लगभग 750 व्यवसायों पर संभावित बंद होने का खतरा मंडरा रहा है। गैस आपूर्ति में व्यवधान बढ़ने से हजारों श्रमिकों पर बेरोजगारी का खतरा है।

Web Title : War Threatens Sangli Industries: 750 Units Face Closure

Web Summary : Gas shortages due to international conflict are crippling Sangli's industrial sector. Around 750 businesses, including foundries and engineering firms, in Kupwad and Miraj MIDC areas, face potential shutdown. Thousands of workers are at risk of unemployment as gas supply disruptions worsen.