Sangli: बोगस शिक्क्यांद्वारे ५० वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला तयार केला, मिरजेत दोघांना अटक

By संतोष भिसे | Published: February 13, 2024 03:55 PM2024-02-13T15:55:09+5:302024-02-13T15:56:47+5:30

जात प्रमाणपत्रासाठी तयार केला शाळा सोडल्याचा बनावट दाखला, जिल्हा परिषद शाळांचे १४ शिक्के जप्त

50 years old school certificate produced through bogus stamps for caste certificate, Two arrested in Miraj | Sangli: बोगस शिक्क्यांद्वारे ५० वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला तयार केला, मिरजेत दोघांना अटक

Sangli: बोगस शिक्क्यांद्वारे ५० वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला तयार केला, मिरजेत दोघांना अटक

मिरज : जातीच्या प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करणाऱ्या राजाराम आबा गेजगे (वय ५०, रा. सिद्धेवाडी, ता. मिरज) व दिनेश धोंडीराम खांडेकर (वय ३२, रा. मालगाव, ता. मिरज) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली.

गेजगे व खांडेकर यांनी बनावट शिक्का तयार करून जातीच्या प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बोगस दाखला तयार करून दिला होता. मिरज तहसीलदार कार्यालयात जातीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यातील शाळेचा दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नायब तहसीलदार श्रीधर बाळकृष्ण राजमाने यांनी मिरज शहर पोलिसांत गेजगे व खांडेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. 

या बनवेगिरीसाठी गेजगे व खांडेकर यांनी मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांचे चौदा शिक्के तयार केले होते. हे शिक्के मारून दोघेजण बोगस दाखले तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. शाळेचे बनावट शिक्के पोलिसांनी जप्त केले आहेत. जातीच्या प्रमाणपत्रासाठी सुमारे ५० वर्षांपूर्वीचा शाळेचा दाखला लागत असल्याने दोघांनी गुंडेवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद शाळेचा बोगस दाखला तयार करून दिला होता. पोलिस उपनिरीक्षक सपना आडसूळ यांनी फसवणूक प्रकरणी दोघांवर अटकेची कारवाई केली.

Web Title: 50 years old school certificate produced through bogus stamps for caste certificate, Two arrested in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.