‘रत्नागिरी-नागपूर’साठी ४१ हजार झाडे तोडली; ‘शक्तिपीठ’साठी किती कत्तल?

By संतोष भिसे | Updated: April 26, 2025 17:27 IST2025-04-26T17:27:29+5:302025-04-26T17:27:50+5:30

विकासाचे प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर : पुन्हा झाडे लावण्याची तसदी घेतो कोण?

41 thousand trees were cut down in Sangli district for Ratnagiri-Nagpur highway work, now how many trees will be cut down for Shaktipeeth | ‘रत्नागिरी-नागपूर’साठी ४१ हजार झाडे तोडली; ‘शक्तिपीठ’साठी किती कत्तल?

‘रत्नागिरी-नागपूर’साठी ४१ हजार झाडे तोडली; ‘शक्तिपीठ’साठी किती कत्तल?

वाहतूक व दळणवळणाची साधने सक्षम करताना निसर्गाच्या मुळावर घाव घालण्याचे काम होत असेल तर प्रगतीच्या वाटांऐवजी मानवी अधोगतीचा महामार्ग तयार होतो. एकीकडे हरित क्षेत्र वाढविण्यासाठी शासनस्तरावरून कोट्यवधीचा निधी खर्च करीत योजना आखायच्या आणि दुसरीकडे महामार्गांसाठी हरित क्षेत्रावरच घाला घालायचा, असा विरोधाभास दिसून येतो. भरकटलेल्या या वाटेमुळे बिघडणारे निसर्गचक्र, संभाव्य धोके, संकटाच्या वाटेवरून जाताना शेतकरी, पर्यावरणप्रेमी अन् सामान्य नागरिकांमध्ये होत असलेली घुसमट यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका 

संतोष भिसे

सांगली : सुपीक शेतजमिनींवर नांगर चालविणारा शक्तिपीठ महामार्गपर्यावरणासाठीही जीवघेणा ठरणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामासाठी जिल्ह्याच्या हद्दीतील ४१ हजार झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली, आता शक्तिपीठसाठी पुन्हा एकदा पर्यावरणाची हत्या केली जाणार आहे.

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या धाराशिव ते कोल्हापूर टप्प्याच्या पर्यावरणीय मूल्यांकनासाठी रस्ते विकास महामंडळाने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती, त्याला केंद्राने हिरवा कंदील दर्शविला आहे. रत्नागिरी-नागपूरसाठीही हीच प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी अटी-शर्तींसह परवानगी मिळाली होती; पण या अटींचे पालन झाले नसल्याने स्पष्ट झाले आहे. हाच पॅटर्न शक्तिपीठ महामार्गासाठीही वापरला जात आहे. रत्नागिरी-नागपूरसाठी मिरज, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील ४१ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. 

एक झाड तोडताना त्याच्या मोबदल्यात ५ झाडे लावायची अट होती. त्याचे संगोपनही करण्याची अट होती. या अटींवरच वृक्षतोडीची परवानगी मिळाली होती; पण सध्या या महामार्गाची अवस्था पाहिली असता अटींचे पालन झाले नसल्याचे दिसून येते. मिरजेपासून सोलापूरपर्यंत या महामार्गाच्या दुतर्फा भकास माळरान दिसून येते. रस्त्याकडेच्या शेतात शेतकऱ्यांनी जपलेली झाडे हीच काय ती हिरवाई आहे.

वटवृक्षांच्या कमानी उद्ध्वस्त

मिरज ते भोसे या सुमारे २५ किलोमीटर अंतरात जुन्या पंढरपूर रस्त्यावर खूपच मोठ्या संख्येने वडाची झाडे होती. यातील सर्रास झाले १०० वर्षांहून अधिक जुनी होती. या झाडांच्या पारंब्यांनी केलेल्या कमानीतून या मार्गवरून प्रवास करणे म्हणजे अवर्णनीय आनंद होता. या झाडांच्या सावलीत अनेक छोटे-मोठे उद्योग चालत होते. विशेष म्हणजे, ही वृक्षराजी अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचे आश्रयस्थानही होती; पण महामार्गासाठी वटवृक्षांची बेफाम कत्तल झाली, त्यामुळे माणसांसोबतच पक्ष्यांची आश्रयस्थानेही नष्ट झाली. रस्ता भकास झाला.

वटवाघळांकडून द्राक्षबागा उद्ध्वस्त

जुन्या पंढरपूर रस्त्यालगतची वडाची मोठमोठी जाडे तोडल्याने वटवाघळांची कित्येक वर्षांची आश्रयस्थाने संपुष्टात आली. घरे हरवलेली वटवाघळे सैरभैर झाली. त्यांनी थेट द्राक्षबागांवर हल्ले सुरू केले. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत गेल्या पाच-सात वर्षांत मोठ्या संख्येने द्राक्षबागांतील घडांची वटवाघळांनी नासधूस केली. द्राक्ष शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेल्या बागा मातीमोल झाल्या.

Web Title: 41 thousand trees were cut down in Sangli district for Ratnagiri-Nagpur highway work, now how many trees will be cut down for Shaktipeeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.