सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात ३० कारवाया, ५० आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:09 IST2025-04-08T18:09:21+5:302025-04-08T18:09:59+5:30
कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा

सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात ३० कारवाया, ५० आरोपींना अटक
सांगली : दोन महिन्यांत पोलिस विभागाने अमली पदार्थांविरोधात ३० कारवाया केल्या असून, ५० आरोपींना अटक केली आहे. जिल्ह्यातील गुन्हे व अमली पदार्थविषयक गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. म्हणूनच जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी गुन्ह्यांना आळा बसला, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच अमली पदार्थ तस्करांची पाळेमुळे खणून काढून जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी नियमित कारवाई करावी, अशा सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेत सोमवारी अमली पदार्थ टास्क फोर्सची बैठक झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोखर, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, राजेसाहेब लोंढे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हे व अमली पदार्थविषयक गुन्हे नियंत्रणात आले आहेत. कायद्याचा धाक, प्रबोधन आणि व्यसनाधिनांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन उपचार केंद्र अशा सर्व आघाड्यांवर जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याचा ध्यास घेतला आहे.
७६ व्हिडीओ पार्लरची तपासणी पूर्ण : अशोक काकडे
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील ७७ पैकी ७६ व्हिडीओ पार्लरची तपासणी पूर्ण झाली आहे. याठिकाणी संबंधितांना पार्लरमध्ये कोणताही गैरकारभार होता कामा नये, याविषयी काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मद्यविक्रेत्यांना नोटीस काढा
चंद्रकांत पाटील म्हणाले, मद्यविक्री दुकानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली तयार करावी. मद्यविक्री दुकाने अशा गुन्ह्यांची केंद्रे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यासाठी मद्यविक्री दुकान मालकांना त्यांच्या दुकानाच्या परिसरात गुन्ह्यांना प्रवृत्त करणारे वातावरण होणार नाही, याबाबतची दक्षता घेण्यासह दंडाबाबत नोटीस काढावी.
अमली पदार्थमुक्त अभियान
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व खासगी तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही तंबाखूमुक्त शाळांप्रमाणे अमली पदार्थविरोधी प्रबोधनासाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.