Sangli: विभूतवाडीत रानडुकरांमुळे ३० एकर मका उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:37 IST2025-08-27T16:36:44+5:302025-08-27T16:37:12+5:30
वन विभागाकडून नुकसानीचा पंचनामा

Sangli: विभूतवाडीत रानडुकरांमुळे ३० एकर मका उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी सध्या रानडुकरांच्या वाढत्या त्रासामुळे हवालदिल झाले आहेत. विभूतवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांत रानडुकरांनी हैदोस घालत २० ते ३० एकर क्षेत्रातील उभा मका उद्ध्वस्त केला आहे. या हल्ल्यात केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही; तर शेतकऱ्यांच्या जनावरांसाठीच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या हल्ल्यामुळे विशाल मोटे, किसन मोटे, विवेक पावणे, एकनाथ मोटे, तुकाराम पाहुणे, बापूराव मोटे आणि माणिक मोटे या शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. रानडुकरांनी मक्याच्या शेतात घुसून झाडे उपटून टाकली, काही ठिकाणी कणसे खाल्ली; तर काही ठिकाणी झाडे उकरून मोकळ्या जमिनी केल्या. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट आले आहे. शेतीतून मिळणारा उत्पन्नाचा आधार तर गेला; पण दुधाळ जनावरांसाठी पिकवलेला चारा नष्ट झाल्याने जनावरांना खाद्य मिळणार कुठून, हा प्रश्न गंभीर झाला आहे.
परिणामी दूध व्यवसायावरही मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ‘रानडुकरांचा बंदोबस्त करून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्या,’ अशी मागणी केली आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचा त्रास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आटपाडीत या समस्येसंदर्भात शेतकऱ्यांनी उपोषण केले होते; तरीदेखील परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. उलट त्रास अधिकच वाढल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ
या संदर्भात शेतकऱ्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडे धाव घेत नुकसानीची माहिती दिली. पडळकर यांनी तत्काळ वनरक्षक संतोष मोरे यांच्याशी चर्चा करून पंचनाम्यासाठी हालचाल सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
‘रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळाली, तरच आमचा पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकतो.’ - विशाल मोटे, नुकसानग्रस्त शेतकरी
विभूतवाडी येथील परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. सध्या पंचनामे सुरू केले असून निश्चित किती शेतकऱ्यांचे कोणत्या स्वरूपात व किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. - संतोष मोरे, वनरक्षक, आटपाडी.