सांगली जिल्ह्यात २५ लाख लिटर पेट्रोल, २६ लाख लिटर डिझेल शिल्लक; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:01 IST2026-03-26T16:00:27+5:302026-03-26T16:01:07+5:30
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

सांगली जिल्ह्यात २५ लाख लिटर पेट्रोल, २६ लाख लिटर डिझेल शिल्लक; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
सांगली : जिल्ह्यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडे २५ लाख लिटर पेट्रोल तर २६ लाख २० हजार लिटर डिझेलचा साठा शिल्लक आहे. पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असल्यामुळे टंचाई होणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. तसेच एलपीजी गॅसचाही साठा पुरेसा आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीकडे पेट्रोल चार लाख ५० हजार लिटर आणि डिझेल पाच लाख ५० हजार लिटर, बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोल पाच लाख २० हजार लिटर व डिझेल सहा लाख ५० हजार लिटर, आयओसीएल कंपनीकडे पेट्रोल १४ लाख ९० हजार लिटर व डिझेल १४ लाख २० हजार लिटर इतका साठा उपलब्ध आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे. पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्यासाठी अनावश्यक गर्दी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.
दिशाभूल करणाऱ्याविरोधात कारवाई
चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले.
जिल्ह्यात २९८३ टन गॅसचा साठा
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सध्या जिल्ह्यात एलपीजीचा एचपीसीएल कंपनीकडे दोन हजार ७४९ टन गॅस साठा शिल्लक असून, सुमारे दोन हजार ३७ टन गॅस साठा येणार आहे. बीपीसीएल कंपनीकडे ७५.१ टन गॅस शिल्लक असून व सुमारे ११६.४ टन साठा मार्गावर आहे. आयओसीएल कंपनीकडे ४३ टन इतका साठा उपलब्ध आहे. सर्व एलपीजी कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी ग्राहकांना वेळेवर व नियमानुसार सिलिंडर पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.