सांगली महापालिकेच्या २३ जागा खुल्या, २१ जागा ओबीसींना राखीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:52 IST2025-11-12T15:51:32+5:302025-11-12T15:52:08+5:30
Municipal Election: चार प्रभागांना लाॅटरी

सांगली महापालिकेच्या २३ जागा खुल्या, २१ जागा ओबीसींना राखीव
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७८ जागांकरिता मंगळवारी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत सांगलीतील जामवाडी, गावभाग, गणेशनगर, चांदणी चौक, मिरजेतील ब्राह्मणपुरी, किल्ला भाग, म्हैसाळ वेस या प्रभागात प्रत्येकी दोन जागा सर्वसाधारण झाल्याने इच्छुकांना लाॅटरी लागली, तर सांगलीवाडीच्या प्रभागातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या. या सोडतीत अनुसूचित जातीसाठी ११, ओबीसीसाठी २१, तर अनुसूचित जमातीसाठी एक जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होते. पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या निश्चित केलेल्या प्रभागांची यादी वाचून दाखविण्यात आली. प्रभाग क्रमांक १, २, ३, ७, ८, १०,११, १४, १८, १९, २० हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. या प्रभागात महिलांचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले.
महापालिकेच्या शाळा क्रमांक पाचमधील मुलींनी चिठ्ठ्या काढल्या. यात प्रभाग २, ७, १०, १४, १९, २० हे सहा प्रभाग महिलांसाठी राखीव झाले. त्यानंतर अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. २०१८ च्या निवडणुकीत प्रभाग २० मधील एक जागा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव होते. आता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या निवडणुकीसाठी ही जागा थेट अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटासाठी राखीव झाली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी)साठी २१ जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यातील ११ जागा महिलासाठी आहेत. त्याची चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यात प्रभाग १, ३, ४, ५, ६, ८, ११,१२, १५, १६, १८ या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाले. त्यानंतर सर्वसाधारण महिला गटातील २२ जागांची आरक्षण सोडत झाली. प्रभाग ९, १३ व प्रभाग १७ मध्ये प्रत्येकी दोन, तर इतर १८ प्रभागांत प्रत्येकी एक जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली.
चार प्रभागांना लाॅटरी
सांगलीतील जामवाडी, मिरजेतील ब्राह्मणपुरी, मिरज किल्ला भाग, मीरासाहेब दर्गा परिसर या चार प्रभागांतील दोन जागा सर्वसाधारण गटासाठी तर एक जागा सर्वसाधारण महिलांसाठी निश्चित झाल्या. आरक्षण सोडतीत या चार प्रभागांना लाॅटरी लागली.
सांगलीवाडीत इच्छुकांच्या तयारीवर पाणी
सांगलीवाडीचा प्रभाग तीन सदस्यीय आहे. या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग व दोन सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने खुल्या गटातून तयारी केलेल्या इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले.
जागांचा तपशील
प्रवर्ग - जागा - महिलांसाठी राखीव
- अनुसूचित जाती - ११ - ६
- अनुसूचित जाती - १ - ००
- नागरिकांचा मागास प्रवर्ग - २१ - ११
- सर्वसाधारण - ४५ - २२
- एकूण - ७८ - ३९