सांगली जिल्ह्यात यंदा २२ अपघातस्थळे नामशेष करणार, गतवर्षी ३४४ जणांचा अपघाती मृत्यू

By हणमंत पाटील | Published: January 18, 2024 03:14 PM2024-01-18T15:14:03+5:302024-01-18T15:14:36+5:30

सांगली : जिल्ह्यात गतवर्षात ३४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर अपघातामध्ये ६२८ जणांना अपंगत्व आले. अपघाताची वेगवेगळी कारणे असली ...

22 accident sites will disappear in Sangli district this year | सांगली जिल्ह्यात यंदा २२ अपघातस्थळे नामशेष करणार, गतवर्षी ३४४ जणांचा अपघाती मृत्यू

सांगली जिल्ह्यात यंदा २२ अपघातस्थळे नामशेष करणार, गतवर्षी ३४४ जणांचा अपघाती मृत्यू

सांगली : जिल्ह्यात गतवर्षात ३४४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर अपघातामध्ये ६२८ जणांना अपंगत्व आले. अपघाताची वेगवेगळी कारणे असली तरी वारंवार अपघात होणारे ‘ब्लॅक स्पॉट’ही कारणीभूत आहेत. गतवर्षात उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागाने ३६ पैकी १४ ‘ब्लॅक स्पॉट’ नामशेष केले. तर यंदाच्या वर्षात २२ ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील वाहनवाढीचा वेग कायम असून त्याचबरोबर वाहनांची गतीही वाढत आहे. वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. दारूच्या नशेत वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, नादुरुस्त वाहनांचा वापर करणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे ही कारणेदेखील अपघातास कारणीभूत ठरतात. या कारणांबरोबर बऱ्याचदा धोकादायक वळण, अरुंद पूल, अरुंद रस्ता, धोकादायक चढ-उतार अशा प्रकारचे रस्तेही अपघातास कारणीभूत ठरतात.

अशा धोकादायक ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणतात. गेली अनेक वर्षे अशा ठिकाणी सावधानता बाळगा असे सांगणारे फलक झळकत होते. परंतु आता फलक लावण्यापेक्षा ही ठिकाणेच नष्ट करून तेथे सुरक्षित वाहतूक होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यामुळे या रस्त्यावर जिल्हा हद्दीत पूर्वी होणारे अपघातांचे प्रमाण थोडे घटले आहे. या महामार्गावरील तसेच इतर ठिकाणचे १४ ‘ब्लॅक स्पॉट’ कमी केले आहेत. आता उर्वरित २२ ठिकाणे कमी केली जातील. त्यामुळे अपघात कमी होतील.

‘ब्लॅक स्पॉट’ कसे होतात?

जर एखाद्या मार्गावर पाचशे मीटरच्या अंतरात वारंवार अपघात होऊन पाच किंवा पाचपेक्षा जास्त जणांचा अपघाती मृत्यू झाला किंवा दहा जण जखमी झाले तर तो ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर केला जातो. जर याठिकाणी उपाययोजनानंतर अपघात न झाल्यास तो आपोआप यादीतून वगळला जातो.

जिल्ह्यात येथे ‘ब्लॅक स्पॉट’

सद्यस्थितीत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर १० अपघाताची ठिकाणे आहेत. तसेच रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ५ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. तसेच इतर सात ठिकाणी अपघातस्थळे आहेत. यंदाच्या वर्षात ही अपघातस्थळे नाहीशी करण्यावर भर राहणार आहे.

अपघाताचे चित्र

वर्ष - अपघात - बळी - गंभीर जखमी
२०२१ - ६५५ - ३१७ - ६१२
२०२२ - ७२० - ३७३ - ६६७
२०२३ - ७२७ - ३४४ - ६२८

Web Title: 22 accident sites will disappear in Sangli district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.