सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:35 IST2025-08-06T12:35:42+5:302025-08-06T12:35:59+5:30
प्रभाग रचनेत भौगोलिक चुका झाल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी

सांगली जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी १९ हरकती; ११ ऑगस्टला निर्णय
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट, गण प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या १९ हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यापुढे मंगळवारी सुनावणी झाली. हरकती दाखल केलेल्या प्रतिनिधींनी म्हणणे मांडले, मात्र हरकतींवर लवकरच निर्णय दिला जाईल, असे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, सर्व तहसीलदार आणि तक्रारदार उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती. गट आणि गणांवर १९ हरकती दाखल झाल्या होत्या. जिल्हा परिषद गटासाठी १६ व पंचायत समितीच्या गणांसाठी तीन हरकतींचा समावेश होता. आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद गट ६, गण १, जत तालुक्यात गट १, गण १, तासगावमध्ये गट २, कवठेमहांकाळ तालुक्यात एका गटासाठी, वाळवा तालुक्यात गट २, गण १, मिरज तालुक्यात जिल्हा परिषद गटासाठी ४ हरकती दाखल झाल्या होत्या.
या हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्यापुढे तक्रारदारांनी प्रभाग रचनेतील बदलास हरकत असल्याचे स्पष्ट केले. हरकतींसाठी गावांची फोडाफोड, चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद गटांची रचना करणे, पंचायत समितीसाठी संपूर्ण गाव न घेता गावातील काही प्रभाग घेण्यात आले आहेत, याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला. हरकतींवर तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले, मात्र निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला.
११ ऑगस्टला निर्णय
गट आणि गणांसाठी दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय देण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अद्याप सहा दिवसांचा अवधी आहे, मात्र तत्पूर्वी विभागीय आयुक्तांकडून हरकतींवर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.