टंचाईच्या 'गॅस'वरुन आता संसाराच्या 'चुली'वर; सांगली जिल्ह्यात ११ भरारी पथकांकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:55 IST2026-03-13T18:54:15+5:302026-03-13T18:55:58+5:30
महिना होऊनही गॅस नोंदणी होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी

टंचाईच्या 'गॅस'वरुन आता संसाराच्या 'चुली'वर; सांगली जिल्ह्यात ११ भरारी पथकांकडून तपासणी
सांगली : जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांच्या वितरकांकडे रांगा लागल्या आहेत. महिना होऊनही गॅस नोंदणी होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. दिवसभर रांगेत थांबूनही नागरिकांना गॅस मिळत नसल्यामुळे ते संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाभर ११ विशेष भरारी पथके सक्रिय केली असून गॅस एजन्सींसह हॉटेल्स, ढाबे आणि व्यावसायिक आस्थापनांवर अचानक तपासण्या सुरू आहेत.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू केली आहे. घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलिंडर काही ठिकाणी व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याच्या तसेच साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत तपासणी मोहीम सुरू केली आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार भरारी पथके विविध तालुक्यांमध्ये अचानक भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. विशेषतः हॉटेल्स, ढाबे, केटरिंग व्यवसाय, औद्योगिक युनिट्स आणि संशयित ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दोषींवर थेट गुन्हे दाखल
या भरारी पथकात संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे तसेच भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन इंडेन या तेल कंपन्यांचे विक्री अधिकारीही या पथकासोबत समन्वय साधणार आहेत. तपासणीदरम्यान घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर, अनधिकृत साठेबाजी किंवा काळाबाजार आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
हॉटेल्स, ढाबे आणि गोदामांवर विशेष लक्ष
भरारी पथके गॅस एजन्सी, गॅस गोदामे, हॉटेल्स, ढाबे, व्यावसायिक आस्थापना आणि औद्योगिक युनिट्स येथे अचानक तपासणी करणार आहेत. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास परवाने निलंबित करणे, दंड आकारणे किंवा गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तक्रारींसाठी हेल्पलाईन
गॅसचा अवैध वापर किंवा काळाबाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अडचणी, तक्रारी किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक १८००२३३३५५५ किंवा ०२३३-२६००५०० या क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी सांगितले आहे.