'या' कारणांमुळे नात्यांमध्ये वाढतयं पर्सनल स्पेसचं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 17:54 IST2018-07-23T17:53:07+5:302018-07-23T17:54:25+5:30
काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत.

'या' कारणांमुळे नात्यांमध्ये वाढतयं पर्सनल स्पेसचं महत्त्व!
काही लोकं लग्नानंतर 'मी' आणि 'आपण' या दोन शब्दांना समान महत्त्व देतात. आता नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या चौकटी तोडून लग्नाच्या वेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ते एकमेकांवर हक्क गाजवण्यापेक्षा एकमेकांना पर्सनल स्पेस देताना दिसत आहेत. त्यांना याची जाणीव आहे की, कधी त्यांना एकांत पाहिजे आणि कधी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा आहे.
भांडण होणं चांगलं
आधी असं समजलं जात असे की, जर नात्यामध्ये भांडण होत असेल तर ते नातं कमजोर आहे किंवा नात्यामध्ये फूट पडत आहे. पण आताच्या पिढीचा असा समज आहे की, भांडणांमुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. पण ही भांडण वेळीच सोडवणं गरजेचं असतं. तसेच नवीन जोडप्यांच्या म्हणण्यानुसार नवरा-बायको असणं म्हणजे दोघांचे विचार एकच असणं गरजेचं नसतं. दोघांमध्येही मतभेद होऊ शकतात आणि अनेकदा जबाबदाऱ्या, राहण्याची पद्धत किंवा इतर अन्य छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होऊ शकतात. अनेकदा मतभेदांचं रूपांतरही भांडणांमध्ये होतं. परंतु या छोट्या छोट्या मतभेदांना आपापसात सोडवण्याची कलाही या जोडप्यांमध्ये आहे.
घरातील गोष्टी बाहेर कराव्यात
आधी घरातल्या गोष्टी घरातच सोडवण्याचा सल्ला देण्यात येत असे. थोरामोठ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आधी घरातील गोष्टी या घरातील चार भिंतींमध्येच सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यांची चर्चा घराबाहेरील लोकांसोबत करू नये. पण या जुन्या विचारांनाही नवीन जोडप्यांनी पूर्णविराम दिला असून जोपर्यंत त्यांना वाटते की ही समस्या ते सोडवू शकतात. तोपर्यंत ते यामध्ये तिसऱ्या व्यक्तिला येऊ देत नाहीत. पण जेव्हा प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे त्यांना जाणवते त्यावेळी ते घराबाहेरील सदस्याचा सल्ला घेऊन ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.
घटस्फोटाचा विषय
लग्न म्हणजे दोन व्यक्तिंना एकमेकांची साथ देण्यासाठी तयार करण्यात आलेली सामाजिक-पारिवारिक संस्था होय. अनेकदा या नात्यामध्ये फूट पडते आणि त्यावेळी वेगळं होणं हा एकच पर्याय समोर असतो. पण अशा परिस्थितीतही ही जोडपी एकमेकांना समजून घेताना दिसतात. अनेक जोडपी अशी आहेत ज्यांना मुलं झाल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे तरिसुद्धा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ते एकत्र येऊन पार पाडत आहेत.