Mahesh Babu Birthday : महेश बाबूची हटके लव्ह स्टोरी; मराठमोळ्या मुलीवर 'असा' जडला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:27 IST2018-08-09T12:24:39+5:302018-08-09T12:27:18+5:30
साऊथच्या सिमनेमातील स्टार महेशबाबू याचा आज 43वा वाढदिवस. महेशबाबूचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई येथे झाला. साऊथचे सुपरस्टार कृष्णा यांचा महेश बाबू हा मुलगा.

Mahesh Babu Birthday : महेश बाबूची हटके लव्ह स्टोरी; मराठमोळ्या मुलीवर 'असा' जडला जीव!
साऊथच्या सिमनेमातील स्टार महेशबाबू याचा आज 43वा वाढदिवस. महेशबाबूचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई येथे झाला. साऊथचे सुपरस्टार कृष्णा यांचा महेश बाबू हा मुलगा. चाहते महेशबाबूला प्रिंस स्टार म्हणून ओळखतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे महेश बाबू. त्याच्या पडद्यावरील लव्ह स्टोरीप्रमाणे त्याची खऱ्या आयुष्यातील लव्ह स्टोरी देखील हटके आहे. महेश बाबूच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या हटके लव्ह स्टोरीबाबत...
महेश बाबूचा जीव जडला तो म्हणजे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरवर. नम्रता महेशपेक्षा वयाने 4 वर्षांनी मोठी आहे, पण त्यांच्या नात्यात मात्र कोणतंही अंतर कधीच पहायला मिळत नाही. नम्रताने अनेक बॉलिवूड चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे.
1993मध्ये 'फेमिना मिस इंडिया'चा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या 'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. त्यानंतर लगेचच तिने तेलुगु चित्रपट 'वामसी' साइन केला. ज्यामध्ये तिच्यासोबत लिडरोलमध्ये महेश बाबू होता. 'वामसी' महेश बाबूचा पहिला चित्रपट होता.
महेश आणि नम्रताची पहिली भेट 'वामसी' फिल्मच्या मूहुर्तावर झाली होती. या फिल्मच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि शूटींग संपेपर्यंत त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं. पण दोघांनाही आपलं करिअर सांभाळायचं होतं म्हणून त्यांनी आपल्या प्रेमाबाबत कोणालाच काहीच सांगितलं नव्हतं.
त्यानंतर महेशने पुढाकार घेत दोघांच्या नात्याबाबत आपल्या बहिणीला सांगितलं. त्यानंतर त्यांच्या बहिणीने याबाबत घरातील इतर व्यक्तींना सांगितलं. जवळपास 4 वर्ष महेश आणि नम्रताने आपलं नातं सर्वांपासून लपवलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2005मध्ये या दोघांनी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.