रिअल इस्टेट मार्केटचा फुगा...! घरांचा सप्लाय वाढला, ग्राहक कमी झाला; कोणत्या शहरात ही स्थिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:57 IST2025-11-20T16:56:29+5:302025-11-20T16:57:07+5:30
Real Estate Issue Pune: विक्रीचा वेग मंदावल्याने अनेक डेव्हलपर्सनी आता लक्झरी फ्लॅट्स ऐवजी मध्यम-वर्गीयांसाठी घरांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.

रिअल इस्टेट मार्केटचा फुगा...! घरांचा सप्लाय वाढला, ग्राहक कमी झाला; कोणत्या शहरात ही स्थिती...
कोरोना महामारीनंतर देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी उभारी मिळाली असली तरी, आता पुण्यातील गृहनिर्माण बाजार धोक्याची घंटा देत आहे. येथील बाजारात गरजेपेक्षा जास्त 'इन्व्हेंटरी' (न विकले गेलेले फ्लॅट) जमा झाल्यामुळे आणि खरेदीदार अचानक गायब झाल्यामुळे मंदीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अँटीक स्टॉक ब्रोकिंगच्या ताज्या अहवालाने पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याची गंभीर सूचना केली आहे.
प्रोप्टायगरच्या अहवालानुसार, पुण्यात नवीन घरांच्या पुरवठ्यात वार्षिक २६ टक्के वाढ झाली आहे, पण घरांच्या विक्रीत तब्बल २८ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा अर्थ बाजारात मोठ्या प्रमाणावर फ्लॅट तयार झालेले आहेत, पण त्यांना ग्राहक मिळत नाहीत.
याच्या उलट गुरुग्रामसारख्या शहरांमध्ये जिथे मागणी जास्त आणि इन्व्हेंटरी कमी आहे. विक्रीचा वेग मंदावल्याने अनेक डेव्हलपर्सनी आता लक्झरी फ्लॅट्स ऐवजी मध्यम-वर्गीयांसाठी घरांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. नोएडामध्येही फ्लॅटची मागणी वाढू लागली आहे. आदित्य बिर्ला रिअल इस्टेट सारख्या मोठ्या विकासकांच्या प्रकल्पांचे उदाहरण देत, ब्रोकरेजने स्पष्ट केले की गुरुग्राममध्ये मागणी इतकी आहे की सेक्टर ७१ मधील प्रकल्प सुरू होताच तो फुल झाला आहे.
किंमती कमी होण्याची शक्यता
खरेदीदारांची संख्या कमी होत असल्यामुळे पुणे शहरातील मालमत्तांच्या सरासरी किंमतीत घट दिसून येत आहे. बाजारातील ही सुस्ती अशीच कायम राहिल्यास, बिल्डर्सना न विकलेले फ्लॅट क्लिअर करण्यासाठी भविष्यात किंमती आणखी कमी कराव्या लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.