घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 07:16 IST2025-12-25T07:15:47+5:302025-12-25T07:16:04+5:30
नवी मुंबईत घर विक्रीचे नवे उड्डाण; ग्राहकांकडून प्रीमियम घरांना मिळतेय अधिक पसंती

घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील नऊ प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत चालू वर्षाच्या चौथ्या तिमाहीत १६ टक्क्यांची मोठी घट झाली असून, एकूण विक्री ९८,०१९ युनिट्सवर खाली आली आहे. २०२१ नंतरची ही नीचांकी पातळी असल्याचे ‘प्रॉपइक्विटी’च्या अहवालात म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पुण्याच्या बाजारपेठेत तब्बल ३१ टक्क्यांची घसरण झाली आहे.
केवळ विक्रीच नाही, तर नव्या घरांच्या पुरवठ्यातही १० टक्क्यांची घट झाली आहे. कच्च्या मालाचे वाढलेले भाव आणि ग्राहकांकडून प्रीमियम घरांना मिळणारी पसंती यामुळे विकासक ‘सावध’ झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या लाँचिंगची संख्या कमी झाली असली तरी, घरांच्या किमती वाढल्यामुळे प्रकल्पांचे मूल्य ६.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत.
| शहर | चौथ्या तिमाहीत घरांची विक्री | वार्षिक बदल (%) |
| ठाणे | १६,९८७ | -२६% |
| पुणे | १५,७८८ | -३१% |
| बंगळुरू | १५,६०३ | -१% |
| दिल्ली | १२,२१२ | ४% |
| हैदराबाद | ११,३२३ | -१९% |
| मुंबई | ९,१३५ | -२५% |
| नवी मुंबई | ८,४३४ | १३% |
| चेन्नई | ४,५४२ | -३% |
| कोलकाता | ३,९९५ | -११% |
| एकूण | ९८,०१९ | -१६% |
नेमके कुठे काय झाले?
मुंबईत नव्या प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये ३१% सुधारणा झाली असली तरी, विक्रीत २५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.
ठाण्यात तर नव्या घरांचा पुरवठा ३० टक्क्यांनी घटला असून ही देशातील सर्वांत मोठी वार्षिक घसरण ठरली आहे.
नवी मुंबई आणि दिल्लीने नेमका कसा केला विक्रम?
एकीकडे संपूर्ण देशात मंदीचे सावट असताना नवी मुंबईने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवी मुंबईत घरांच्या विक्रीत वार्षिक १३ टक्के आणि तिमाहीत १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. नवी मुंबईसह दिल्ली-एनसीआर हे दोनच ठिकाणे आहेत जिथे विक्रीत अनुक्रमे १३% आणि ४% वाढ नोंदवण्यात आली आहे.