Change of office colors; Positive changes in the 21st century | ऑफिसच्या रंगरुपाचा कायापालट; 21व्या शतकातील सकारात्मक बदल

ऑफिसच्या रंगरुपाचा कायापालट; 21व्या शतकातील सकारात्मक बदल

मुंबई- ऑफिस म्हटलं की फायलींचा ढिगारा, त्या ढिगाऱ्यात खुपसलेल्या माना, कंटाळवाणे रंग, अंधुक प्रकाश असे सरकारी कार्यालयांचे रुप तुमच्या डोळ्यांसमोर असेल. पोस्टामध्ये तिकीटं चिकटवायच्या जागेजवळ पुसलेली खळीचं बोटं आणि बँकांमध्ये दोरीला बांधलेले पेनही तुम्ही पाहिली असतील. मात्र भारतातील ऑफिसची रचना आणि त्यांचे रंगरुप आता बदलत चालले आहे. खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये हा बदल वेगाने झालेला दिसून येतो. त्यापाठोपाठ इतर कार्यालयंही बदलत चालली आहेत.

1) ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक ऊर्जेने आणि तितक्याच उत्साहाने काम  करता यावे यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुविधा, स्वच्छता यांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
2) स्टार्ट अप कंपन्यांच्या ऑफिसमध्ये अधिक मोकळ्या वातावरणाचा अनुभव घेता येतो. केबिन्सच्या चौकोनांमध्ये अडकलेली कार्यालयं या कंपन्यांनी मोकळी केली. कोणीही आपल्याला हव्या त्या जागेवर बसून कॉफी पित लॅपटॉपवर काम करावे अशी रचना नव्या कंपन्यांमध्ये दिसत आहे.

3) काही कंपन्यांनी पूर्वीच्या खुर्ची टेबलच्या जुनाट पद्धतीला निरोप देऊन बसण्याची नवी योजना करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये खिडकीतील कट्ट्यापासून बिनबॅग पर्यंत विविध नव्या उपायांचा विचार त्यांनी केला. यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्याला हव्या त्या जागेवर आरामशीर बसून काम करता येते.

4) काही कंपन्यांनी डायनिंग टेबलसारख्या मोठ्या टेबलभोवतीही बसून लॅपटॉपवर काम करण्याची सुविधा देऊ केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद साधण्यासही त्यांना मदत झाली.

5) कार्यालयांच्या नव्या रचनेमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठीही जुनाट पद्धतीचा वापर करण्याऐवजी पाहुण्यांना मोकळे, आपलेसे वाटेल असे वातावरण तयार केले जाते. एकदम घरगुती वाटेल अशा पद्धतीच्या वातावरणात आदरातिथ्य केल्यास येणाऱ्या व्यक्तीला अधिक प्रसन्न वाटते असा अनुभव आहे.

6) ज्या कंपन्यांचा संबंध सतत ग्राहकांशी येतो त्या कंपन्यांनीही आपल्या रचनेमध्ये बदल केला आहे. वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक टिकवून ठेवणे हे एक आव्हान असते. म्हणूनच ग्राहकांना योग्य त्या सुविधा, स्वच्छतागृह उपलब्ध करुन देणे, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व्यक्तीची नेमणूक करणे अशे प्रयत्न केले जात आहेत.

7) काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना व्यायामशाळा, ट्रेडमिल, योगसनांसाठी जागा देणे अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत तसेच रोजच्या कामाच्यावेळात काही वेळ मनोरंजनासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे.
 

Web Title: Change of office colors; Positive changes in the 21st century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.