रत्नागिरी : खरेदीसाठी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळच्या सुमाराला रत्नागिरी शहरातील चर्मालयाजवळ झाला.मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव तिवंडेवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी झाला आहे.मयूर आणि त्याचा मित्र ओंकार हे दोघे दुचाकीवरून खरेदीसाठी जात होते. त्याच वेळी समोरून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मयूरचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी ओंकारला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. ऐन गणेशोत्सवातच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Ratnagiri: दुचाकीला डंपरची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 15:11 IST