Ratnagiri: परशुराम घाटात कामाला गती, गॅबियन वॉलला येतोय आकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:54 IST2025-04-03T17:54:14+5:302025-04-03T17:54:43+5:30
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. या कामांची नुकतीच ...

Ratnagiri: परशुराम घाटात कामाला गती, गॅबियन वॉलला येतोय आकार
चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. या कामांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली होती. आता या कामाचा वेग वाढवला असून, धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम ६० टक्के होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच गॅबियन वॉलच्या पायथ्याचे कामही वेगात सुरू असल्याने ही भिंत आताच आकार घेऊ लागली आहे.
मुंबई-गोवामहामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षे रखडले असून, विविध टप्प्यावर काम रखडली आहेत. त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २३ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. प्रामुख्याने गेल्या दोन महिन्यांत वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तर दुसऱ्या बाजूला भरावाच्या ठिकाणी रस्ता व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यासाठी दरडीच्या भागात लोखंडी जाळीच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. जागोजागी खडकात व दरडीच्या भागात आठ ड्रिल मशीनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे कामही वेगात सुरू केले आहे. सुरुवातीला सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या साहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. हे काम उपाययोजनांच्या दृष्टीने कितपत फायदेशीर ठरेल याचा अद्याप अंदाज आलेला नाही.
घाटासह उड्डाणपुलावर लक्ष
दोनच दिवसांपूर्वी आमदार नीलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर आल्यानंतर ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी ठेकेदाराला स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. त्यामुळे संबंधित यंत्रणेने परशुराम घाटातील उपाययोजनांसह उड्डाणपुलाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.