संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:02 IST2025-04-28T17:01:44+5:302025-04-28T17:02:58+5:30
देवरुख : कोकणाला जास्तीचा निधी कधी मिळत नव्हता. मात्र, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ. राष्ट्रीय पातळीचे ...

संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
देवरुख : कोकणाला जास्तीचा निधी कधी मिळत नव्हता. मात्र, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ. राष्ट्रीय पातळीचे स्मारक करताना हेरिटेज टच देऊन येथील हवामानाच्या दृष्टीने ते टिकाऊ बनवू या. निधीची काळजी करू नका, स्मारकासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या नियाेजित स्मारकाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी कर्णेश्वर मंदिर परिसरात आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजित नागेशकर, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, तहसीलदार अमृता साबळे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी कसबा येथे दाखल हाेताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संभाजी स्मारक परिसरासह सरदेसाई वाड्याची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत स्थापत्य अभियंता नागेश्वर यांनी पॉवर पॉइंटद्वारे माहिती दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. स्थानिकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांच्या सहमतीने स्मारक उभे करायचे आहे. ज्याची जागा जाईल त्यांना योग्य तो मोबदला देऊ. स्मारक भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठमोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करावा, असे सुचविले. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड येथील अभियंता शेखर सिंग यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला.
अधिवेशनापूर्वी सर्व बाबी पूर्ण करा
स्थानिक पातळीवरील नकाशे, अन्य बाबी लवकरात पूर्ण करून मला माहिती द्या. ३० जूनला पावसाळी अधिवेशन होत आहे. यात स्मारकासाठीच्या निधीला मंजुरी द्यायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचे सरकार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल, यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
सायरनच्या आवाजाने मधमाश्या पिसाळल्या
कर्णेश्वर येथील आढावा बैठक संपवून संगम मंदिराची पाहणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा सायरन वाजताच संगम मंदिरानजीक असणाऱ्या मधाच्या पोळ्यामधील मधमाश्या बाहेर आल्या. या माश्या आवाजाच्या दिशेने धावून आल्या, यातील काही मधमाश्यांनी दोघांना चावल्याचीही चर्चा आहे.
प्रसारमाध्यमांना राेखले
कसबा येथील छत्रपती संभाजी स्मारकाच्या नियाेजित जागेची पाहणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना राेखले. ‘अरे थांबा ना बाबा, मराठीत सांगितलेले कळत नाही, आम्हाला काम करू द्या, तुम्ही त्रास दिला तर निघून जाईन,’ असे ते म्हणाले. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी संवाद न साधताच ते निघून गेले.