बेकायदा वाळू उत्खननाला आशीर्वाद कोणाचा, चिपळूण तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:35 IST2025-01-13T17:34:55+5:302025-01-13T17:35:15+5:30
चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाने सक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी आणलेली असतानाही येथील करंबवणे -बहिरवली खाडीत सक्शन पंपाने अवैध वाळू ...

बेकायदा वाळू उत्खननाला आशीर्वाद कोणाचा, चिपळूण तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न
चिपळूण : सर्वोच्च न्यायालयाने सक्शन पंपाने वाळू उपसण्यावर बंदी आणलेली असतानाही येथील करंबवणे -बहिरवली खाडीत सक्शन पंपाने अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी होत असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीर दखल घेत या बेकायदा वाळू उत्खननाला कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांना केला आहे. याबाबत पाठवलेल्या पत्रात त्यांनी तातडीने कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
तालुक्यातील करंबवणे बहिरवली खाडीत गेल्या काही महिन्यांपासून रात्रदिंवस सक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन केले जात असल्याची ओरड सुरू आहे. याबाबत संबंधित मंडल अधिकारी, तलाठी व स्थानिक अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. अखेर काही दिवसांपूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाने कारवाई येथे कारवाई केली. मात्र, त्यानंतरही चोरटा वाळू व्यवसाय सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही करंबवणे, मालदोली गावातून सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर आणि विनारॉयल्टी वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत तीन तक्रार अर्ज चिपळूण तहसीलदार लोकरे यांच्याकडे देऊनही कारवाई होत नसल्याचे संबंधित तक्रारदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्याची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे.
खेड, दापोलीतही वाळूचोरी
चिपळूणमधील करंबवणे, मालदोलीसह खेड तालुक्यातील बहिरवली, दिवा बेट, दापोली तालुक्यातील आंजर्ले, केळशी, हर्णे, म्हसोंडा, सारंग, मालदोली, अडखल, मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आदी ठिकाणी सेक्शन पंपाद्वारे बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे याठिकाणीही कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेले काही महिने चिपळूण हद्दीत वाळू उत्खनन पूर्णतः बंद आहे. भरारी पथकामार्फत दिवस रात्र गस्त घातली जात आहे, तसेच तक्रार येतात तातडीने कारवाईदेखील केली जात आहे. - प्रवीण लोकरे, तहसीलदार, चिपळूण